Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा पुण्यात अपघात झाला. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. सातत्याने होणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये चुका काय असतात आणि हेलिकॉप्टर प्रवास करणाऱ्या नेत्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
१. देशामध्ये ४० टक्के हेलिकॉप्टर अपघात हे पायलटच्या चुकीमुळे होतात, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
२. १९ टक्के हेलिकॉप्टर अपघात हे प्रतिकूल हवामानामुळे होतात.
३. ९ टक्के अपघात हे दुर्गम भागातील डोंगराळ प्रदेशांमध्ये होतात. तिथे असलेल्या युटिलिटी केबल्समुळे हे अपघात होतात.
४. ज्या भागात युटिलिटी केबल्स अथवा तारा असतात तिथे सावधानतेचा इशारा देणारी कुठलीही यंत्रणा नसते.
५. व्यावसायिक हेलिकॉप्टरमध्ये होणारे ८५ टक्के अपघात हे दिवसाच्या उजेडात झालेले आहेत. यात सागरी उड्डाणावेळी आणि हेलिकॉप्टर उतरत असताना अपघात झाले आहेत.
भारतामध्ये होणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातांच्या कारणांमध्ये उड्डाण परवाना आणि प्रशिक्षण निकष पाळले जात नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या सुरक्षा निरीक्षण ऑडिटमध्ये ही माहिती पुढे आलेली होती. प्रशिक्षण संस्थेकडून नियम आणि अटींचे पालन केले जात नसल्याचं स्पष्ट झालेलं होतं.
पुण्यामध्ये अपघात झालेलं हेलिकॉप्टर हे दिल्लीस्थित एका कंपनीच्या मालकीचं होतं. पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिजॉर्ट येथील हेलिपॅडवरून हे उड्डाण करत होतं. पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. अपघात झाल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि त्यात असलेले दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे नेत्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नसतो. अशावेळी नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. उड्डाणाची परवानगी, पायलट प्रशिक्षित आहेत का?, वातावरण योग्य आहे का? याची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय उड्डाणाच्या वेळा तातडीने पाळल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याची गोष्टीसाठी पायलटवर दबाव आणला नाही पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.