Pune Hill : कुठयेत झाडी कुठंय डोंगूर! वारजे परिसरात टेकड्या उद्‍ध्वस्त

पुणे शहरात गेल्या २५ वर्षांमध्ये विकासकामे करताना सर्वाधिक घाव वारजे येथील वेगवेगळ्या टेकड्यांवर बसले आहेत. त्यामुळे या टेकड्या खिळखिळ्या झाल्याचे दिसते.
pune Hills destroyed in Warje area slum illegal construction
pune Hills destroyed in Warje area slum illegal construction sakal
Updated on

पुणे - शहरात गेल्या २५ वर्षांमध्ये विकासकामे करताना सर्वाधिक घाव वारजे येथील वेगवेगळ्या टेकड्यांवर बसले आहेत. त्यामुळे या टेकड्या खिळखिळ्या झाल्याचे दिसते. विकासासाठी तोडलेल्या जागेत आता एकीकडे सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत, तर दुसरीकडे टेकड्यांवर झोपडपट्टी वसली आहे. दगडखाणी, प्लॉटिंग, अनधिकृत बांधकामे यांनीही टेकड्यांचे लचके तोडले आहेत.

इतिहास काय सांगतो?

वारजे येथील टेकड्यांच्या इतिहासाची १८०० पासूनची माहिती उपलब्ध आहे. हे सुरुवातीपासून गायरान होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्यांची गुरे, मेंढ्या चरण्यासाठी या टेकड्यांवर आणत. कालांतराने यातील काही जमिनीवर वनक्षेत्रासाठी आरक्षित झाली. टेकडीचा काही भाग राज्याच्या महसूल विभागाकडे आहे, तर काही भाग खासगी जमीनधारकांचा आहे.

पौराणिक महत्त्व

वारज्यात एका टेकडीवर म्हसोबाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे चार गावांची वेस मानली गेली आहे. वारजे, कोथरूड, बावधन, भूगाव या चार गावांची वेस या म्हसोबाच्या मंदिराजवळ एकत्र येतात.

वृक्षराजीऐवजी सिमेंटचे जंगल

  • पुण्याच्या पश्चिमेला असणाऱ्या वारज्यातील टेकड्यांवर १९५० ते ६० पासून खऱ्या अर्थी विकासाचा दाब पडू लागला. या दरम्यान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) सुरू झाली.

  • पानशेतच्या पुरानंतर कोथरूड हे नवीन उपनगर वसलं.

  • १९९८ मध्ये या टेकड्यांमधून मुंबई-बेंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ विकसित करण्यात आला.

  • पुणे २००० पासून वेगाने वाढू लागले. याचा सर्वाधिक परिणाम झालेला भाग म्हणजे वारज्यातील टेकड्या.

  • विकासाच्या नावाखाली झाडे कापली. जंगल तोडून त्या जागी सिमेंटचे जंगल उभे राहिले.

केलेल्या उपाययोजना

रामनगरमधील जमीन ही वन आणि महसूल खात्याची आहे. त्यापैकी वन खात्याच्या जमिनीच्या काही भागांत झोपडपट्टी निर्माण झाली. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हळू हळू या झोपड्या वाढत आहेत. या टेकडीवर झोपडपट्टी वाढू नये, यासाठी अखेर मोठी भिंत उभारण्यात आली.

वन उद्यानाच्या ताब्यात काही टेकडीचा भाग आहे. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले. डुक्करखिंड ते तिरुपतीनगर या दरम्यान वन खात्याच्या जमिनीवर देशी वृक्षारोपणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

वारजे भागात गेल्या काही वर्षांपूर्वी एका दिवसात पाचशे झोपड्या पडल्या होत्या. त्या वेळी महापालिका आयुक्तांच्या मदतीने कारवाई करून झोपड्या काढल्या. महसूल खात्याबरोबर महापालिकेने संयुक्त प्रकल्प राबविला. त्यातून संरक्षित भिंत बांधण्यात आली. त्यामुळे पुढे टेकडीवर झोपडपट्टी वाढली नाही.

- दिलीप बराटे, माजी नगरसेवक

वारज्याच्या हद्दीपासून वनक्षेत्र सुरू होते. यातील बहुतांश भाग ‘एनडीए’चा आहे. तेथे वनक्षेत्र संरक्षित असल्याने तेथे वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आहिरेमध्ये नुकताच बिबट्या आढळला, तसेच अनधिकृत प्लॉटिंग आणि त्यावर केलेली बांधकामे या येथील मुख्य समस्या आहेत.

- सचिन दोडके, माजी नगरसेवक

वारजेच्या भागात काही खाणी आहेत. त्यात बांधकामाचा राडारोडा टाकून टाकण्यात येत आहे. त्यातून काही खाणी बुजविण्यात आल्या. डुक्करखिंडच्या बाजूने महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरही अशाच पद्धतीने राडारोडा टाकण्यात येत आहे.

- अनिरुद्ध जांभेकर, रहिवासी

समस्या काय आहेत?

  • बेसुमार वाढलेली झोपडपट्टी

  • मोठ्या प्रमाणात झालेले प्लॉटिंग

  • बेकायदा उभारलेल्या इमारती

  • नियोजित विकासाचा अभाव

गीतेवर प्रवचने देताना विनोबा भावे यांनी सहज-सोप्या भाषेत गीता समजावून सांगितली आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे आजही लागू पडतात. आठव्या अध्यायावरील प्रवचनावेळी ते म्हणतात, डॉक्टरने रोज डोस घ्यावयास सांगितले. परंतु आपण ते सगळे औषध एकदम घेतले तर? चमत्कारिक होईल. औषधाचा हेतू सफळ होणार नाही.

औषधाचा रोज संस्कार होऊन प्रकृतीतील विकृती दूर केली पाहिजे. शंकरावर हळू हळू अभिषेक करायचा असतो. लहानपणी मी ती क्रिया रोज पहायचो. चोवीस तास मिळून ते एकंदर पाणी फार तर दोन बादल्या होईल. पटकन दोन बादल्या पिंडीवर ओतल्या तर? सांगायचे तात्पर्य... कुठलीही गोष्ट करताना त्याचे काही नैसर्गिक नियम असतात.

‘विकास’ या नावाखाली आज जे सुरू आहे, हे आपल्याला कुठे घेऊन जाणार याची कल्पनाही करवत नाही. निसर्ग उद्‍ध्वस्त करून केलेला विकास खरंच मानवजातीच्या फायद्याचा आहे का, याचा विचार सर्वांनी करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील टेकड्यांची जी लचकेतोड सुरू आहे याबाबत आपल्या सूचना किंवा मते सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

थोडक्यात महत्त्वाचे...

  • वारजे परिसरात प्रमुख तीन टेकड्या येतात. रामनगर टेकडी, वारजे जलशुद्धीकरण दरम्यानची गोकुळनगर टेकडी आणि चांदणी चौकाच्या परिसरातील तिसरी टेकडी.

  • वारजेची सर्वांत उंच टेकडी समुद्रसपाटीपासून ६१५ मीटर उंच आहे.

  • शहरातील वेताळ टेकडी आणि शहराबाहेरील एनडीएची टेकडी या चांदणी चौकात एकत्र येतात.

  • वस्तुतः या टेकड्या पूर्वी एकसलग होत्या.

  • दरम्यान चारपदरी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आला. त्यामुळे या दोन्ही टेकड्या वेगळ्या झाल्या.

  • या टेकड्यांवर डुक्कर खिंड, बालभारती खिंड अशा नैसर्गिक खिंडी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.