Pune - खडकवासला धरणाच्या उजव्या बाजूने असलेल्या एनडीए -बहुली रस्त्यावरील पुलाच्या संथ सुरू असलेल्या कामामुळे पर्यायी रस्त्यावरुन ये-जा करताना स्थानिकांसह पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अचानक मोठा पाऊस झाल्यास पर्यायी रस्ता पाण्याखाली जाईल व परिणामी सांगरुण, बहुली, डावजे, जांबली यांसह इतर गावांचा संपर्क तुटण्याची भीती असल्याने पूलाचे उर्वरित काम तातडीने करुन वाहतूक सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
एनडीए-बहुली रस्त्यावरील खडकवाडी गावच्या हद्दीत असलेला जुना पूल धोकादायक बनला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुना पूल पाडून नवीन पूलाचे काम सुरू केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूलाचे काम पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत होते मात्र उशिराने पाऊस सुरू झाला तरीही अद्याप पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
सध्या पुलाच्या बाजूने ओढ्यातून पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक सुरू आहे. सततच्या पावसामुळे या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, पर्यटक व हॉटेल व्यावसायिक यांची या रस्त्यावरुन मोठी वर्दळ असते.
अचानक मोठा पाऊस झाल्यास पर्यायी रस्ता पूर्ण पाण्याखाली जाईल व वाहतूक बंद होऊन सर्वांची गैरसोय होईल, त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे बाकी असलेले काम पूर्ण करुन सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
पर्यटकांसह भाविकांचीही असते वर्दळ
या भागात अनेक हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट आहेत. पाऊस सुरू झाल्यामुळे या भागातील वातावरण अत्यंत निसर्गरम्य झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. तसेच श्रावण महिन्यात डावजे येथील निळकंठेश्वर मंदिरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. त्यावेळी या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. त्यामुळे लवकरात लवकर या पूलाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
"पाऊस सुरू होण्यापूर्वी पूलाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही. कच्च्या रस्त्यावरुन ये-जा करताना हाल होत आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करुन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा." विकी मानकर, माजी उपसरपंच, सांगरुण.
"पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. जर मोठा पाऊस झाला तर पर्यायी रस्ता वाहून जाईल व स्थानिकांसह पर्यटकांचीही गैरसोय होईल. त्यामुळे दुर्घटना होण्याच्या अगोदर पूलाचे काम पूर्ण करण्यात यावे." समीर पायगुडे, माजी सरपंच, कुडजे.
"पुलाचे काम पूर्ण झाले असून क्युरिंगही झालेले आहे. दोन्ही बाजूला रॅंप करण्यास सांगितला असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे." नामदेव राठोड, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.