Kathak History : कथकचा इतिहास उलगडणार!

कथक या अभिजात भारतीय नृत्यशैलीचा उगम मुघल काळात झाला, असा समज प्रचलित आहे.
Kathak Dance
Kathak DanceSakal
Updated on

पुणे - कथक या अभिजात भारतीय नृत्यशैलीचा उगम मुघल काळात झाला, असा समज प्रचलित आहे. मात्र, खरेतर त्याचा उगम प्राचीन काळातील असून भरतमुनींनी रचलेले नाट्यशास्त्र तसेच प्राचीन शिल्पांमध्ये वेगवेगळ्या रूपांनी कथकचा अनुबंध आढळून येतो, असे ज्येष्ठ कथक नृत्यगुरू रोशन दात्ये यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले. २१ वर्षीय रेवा रावत या तरुणीने याच संशोधनावर आधारित ‘कथक आदि-कथक’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

रेवा रावत ही इतिहास विषयात पदवीचे शिक्षण घेत असून चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. ‘कथक नृत्यशैलीत आजही कल्पक व नावीन्यपूर्ण प्रयोग केले जातात. मात्र, नवे प्रयोग करण्यापूर्वी मूळ स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. गुरू रोशन दात्ये यांचे संशोधन कथकचे मूळ स्वरूप उलगडण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हे संशोधन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून या माहितीपटाची कल्पना सुचली’, असे रावत यांनी सांगितले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींतर्गत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या माहितीपटाची संकल्पना आवडल्याने इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनीही या माहितीपटाला विशेष सहकार्य केले आहे. याचे लेखन व दिग्दर्शन रेवा रावत यांनी केले असून गुरू रोशन दात्ये यांच्यासह आभा औटी व निधी कोंडेजकर अशा तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नृत्यांगनांचा यात सहभाग आहे.

संशोधन का महत्त्वाचे?

ओडिसी, भरतनाट्यम् अशा सर्व नृत्यशैलींचा उगम प्राचीन काळातील आहे, याचे पुरावे विविध शिल्पांमधून आढळून येतात. मात्र, कथकबाबत पुरेसे संशोधन झाले नसल्याने असे पुरावे सापडत नव्हते. मी याबाबत संशोधन सुरू केल्यानंतर त्याच्या खुणा सापडल्या. आजच्या कथकमध्ये केल्या जाणाऱ्या मुद्रा, भाव अनेक शिल्पांमध्ये दिसून आले. आजच्या कथकमधील अनेक क्रियांची नावे नाट्यशास्त्रात सापडली. त्यामुळे कथकच्या उगमाचा आणि विकासाचा काळ स्पष्ट करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे, असे गुरू रोशन दात्ये यांनी सांगितले.

कथकचे आजचे स्वरूप आपल्याला माहिती आहे; मात्र त्याचे मूळ म्हणजेच आदिम स्वरूप शोधण्याच्या हेतूने मी संशोधन सुरू केले. कथकशी निगडित नृत्यचित्रे व शिल्पे, हा माझ्या संशोधनाचा विषय होता. यावर आधारित ‘कथक आदि-कथक’ हे पुस्तक लिहिले आहे. माहितीपटाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

- रोशन दात्ये, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.