कात्रज: सुखसागरनगर भाग १, भाग २, दत्तनगर, भारतनगर, वाघजाईनगर, जाधवनगर, राजीव गांधीनगर, कात्रज-कोंढवा रस्ता या भागांत सातत्याने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन याची दखल घेत नाही. तसेच कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करत नसल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने राजस चौकातील शिवगोरक्ष पटांगणांवरून महादेवनगर टाकीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी टाकीवर ठिय्याही मांडला.
माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. कदम म्हणाले, 'पाण्याची पातळी न राखल्याने पाणी कमी पडत आहे. याबाबत अनेकदा निवेदने दिली. परंतु, त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा असून एक तासही पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसताना मात्र २४/७चे स्वप्न दाखविले जाते. मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असताना हक्काचे पाणी मिळत नाही. 'टाक्या आमच्या उशाला आणि कोरड घशाला' अशी स्थिती झाली आहे. पाणी वेळी-अवेळी येत असल्याने नागरिक पाण्यासाठी धडपड करत आहेत. मुळात २४/७ ही योजनाच भ्रष्टाचार करण्यासाठी अस्तित्वात आणली आहे'.
यावेळी प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, संतोष धुमाळ, सिद्धार्थ वर्धन यांनी मनोगते व्यक्त केली. 'टाकीवर येऊन आंदोलन करावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. परिसरातील पाणीसंकट हे भयंकर असून एवढ्या जवळ ७० लाख लिटर क्षमता असलेली टाकी असताना पाणी मिळत नाही. हा प्रशासनाचा नाकर्तेपणा असल्याचे यावेळी प्रतिक कदम म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका भारती कदम, उदयसिंह मुळीक, ओंकार घाटे, पाणी पुरवठा विभागाचे संदिप मिसाळ उपस्थित होते.
आज निवेदनाचा स्वीकार केला आहे. हे निवेदन वरिष्टांपर्यंत पोहचविण्यात आले असून त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी स्वारगेट विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक बोविण्यात आली आहे. लवकरात लवकर कात्रज परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल - प्रशांत कुंभार, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.