खडकवासला : पुणे शहर व जिल्हाला पिण्यास व शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार ही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चार ही धरणातून विसर्ग सुरू आहे.
धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ५५२ क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे ५७० क्यूसेक्स म्हणजे एकूण चार हजार १२२ क्यूसेक सुरु आहे.
धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. वेल्हे तालुक्यात हे धरण आहे. अंबी नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या एक हजार ९५४ क्यूसेक विसर्ग सुरु आहे.
तिसरे टेमघर धरण आहे. मुळशी तालुक्यात हे धरण आहे. मुठा नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. हे धरण यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून सध्या १०० क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे.
चौथे धरण खडकवासला आहे. हे धरण हवेली तालुक्यात आहे. याचे पाणलोट क्षेत्र वेल्हे तालुक्यालगत आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून आज सहा हजार १७६ क्युसेक पाणी या धरणात जमा होत आहे. या शिवाय खडकवासला धरणातील स्थानिक येवा पाहून खडकवासला धरणातील विसर्ग सोडला जातो. आज या धरणातून चार हजार ७०८ क्युसेक पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून यंदा ११ टीएमसी पाणी सोडले आहे.
टेमघर धरण भरल्याने सांडव्यावरून पाणी पडतानाचे मनमोहक दृश्य
टेमघर धरण आज शुक्रवारी पहाटे तीन वाजता पूर्ण भरल्याने भरून वाहू लागले धरणाच्या उंच २०० फूट सांडव्यावरून पाणी खाली वाहत येत असल्याचे सुंदर मनमोहक दृश्य दिसत आहे.
टेमघर धरण मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर बांधले आहे. या धरणात एक जून पासून दोन हजार ८४७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गुरुवारी संध्याकाळी धरण ३.६७ टीएमसी म्हणजे ९९.०९ टक्के भरले होते. पहाटे तीन वाजता धरणात ३.७१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला अन भरून वाहू लागले.
या धरणाला दरवाजे नसल्याने धरण भरले की, धरणाच्या सांडव्यावरून नैसर्गिक रित्या विसर्ग सुरू होतो. त्याप्रमाणे सकाळी सहा वाजता १०० क्यूसेकचा विसर्ग सुरू झाला आहे. या धरणाला दरवाजा नाही. त्यामुळे, त्यानंतर पाऊस होईल त्या प्रमाणे धरणातील विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. धरणातील विसर्ग सुरू झाल्याने टेमघर धरणाच्या खालील गावातील नागरिकांनी खबरदारी घावी. नदीपात्रात जाऊ नये. नदी लगत शेती असलेल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
खडकवासला मध्ये सतर्कतेचा इशारा
वरसगाव, पानशेत व टेमघर हि वरील तिन्ही धरण १०० टक्के भरली आहेत. परिणामी या तिन्ही धरणातून येणारे पाणी आणि खडकवासला धरणाचे असे दोन्ही मिळून पाणी खडकवासला धरणातून सोडावे लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच बरोबर सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांनी सज्ज राहावे. धरणाच्या पाणलोट क्षेत्र व नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सतर्कता बाळगावी.
-विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.