किरकटवाडी : सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने किरकटवाडी येथील अकरा वर्षांचा हरवलेला मुलगा सापडला आहे. तब्बल वीस तास परिसरात शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत असतानाच मुलाच्या आईला फोन आला," तुमचा मुलगा सापडला आहे, तो किरकटवाडीतील एका किराणा दुकानासमोर बसलेला आहे!" हे शब्द ऐकल्यानंतर रडून व्याकूळ झालेल्या आईच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मुलगा सापडल्याने तक्रार दाखल न करता पोलीसांचे आभार मानून आई-वडील ताबडतोब किरकटवाडीला आले. मुलगा दिसताच आई त्याला कवटाळून रडायला लागली.
श्रेयस सचिन सावंत (वय 11, रा. भैरवनाथ नगर, किरकटवाडी .) हा मुलगा काल दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून घरातून गेला होता. दररोज खाली पार्किंगला खेळण्यासाठी जात असल्याने आईने लक्ष दिले नाही. संध्याकाळी उशीर झाला तरी श्रेयस घरी न आल्याने आईने त्याच्या मोठ्या भावाला श्रेयसला घेऊन येण्यासाठी पाठवले परंतु तो सापडला नाही. घाबरलेल्या आईने आजूबाजूला त्याच्या मित्रांकडे चौकशी केली, परिसरात शोध घेतला पण श्रेयस काही मिळून आला नाही.
रात्र उलटून गेल्यानंतरही श्रेयस घरी न आल्याने आई-वडील ग्रामपंचायत कार्यालयात कॅमेरे तपासण्याची विनंती करण्यासाठी गेले तेव्हा कार्यालय उघडण्याची वेळ झालेली नव्हती. बाहेर भेटलेल्या सरपंच गोकुळ करंजावणे यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सरपंचांनी याबाबत तत्काळ हवेली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले. सरपंच गोकुळ करंजावणे यांनी श्रेयस हरवल्याबाबत आणि कोणाला आढळून आल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असा मेसेज गावातील व परिसरातील सर्व व्हॉट्स ॲप गृपवर फोटोसह पाठवला. तोपर्यंत श्रेयसचे आई-वडील तक्रार दाखल करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्यात गेले होते. सरपंचांनी गावातील गृपवर टाकलेला मेसेज व्हायरल झाला.
अजय सोनवणे या तरुणाने मेसेज मधील वर्णनाचा मुलगा एका किराणा दुकानासमोर घाबरलेल्या अवस्थेत बसलेला पाहिला व दिलेल्या नंबरवर फोन करुन त्या मुलाचे आईशी बोलने करुन दिले. मुलाचा आवाज ऐकून आईला आनंद झाला. ताबडतोब आई-वडील त्या दुकानापाशी आले. घाबरलेल्या श्रेयसला आईने कवटाळले. दरम्यान श्रेयसने तो मित्राकडे गेला होता असे रडतरडत सांगितले. श्रेयसच्या आई-वडिलांनी अजय सोनवणे, दुकानदार विकास हगवणे, सरपंच गोकुळ करंजावणे व हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस या सर्वांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.