चित्रकला हा एक सर्जनात्मक कलाप्रकार आहे. मुलांच्या सौंदर्यदृष्टीचा, नवनिर्मितीचा आविष्कार चित्रकलेतूनच होतो. चित्र काढण्याच्या प्रक्रियेत मुले व्यक्त होतात आणि आनंदी राहतात. समाधानी आयुष्य जगण्यास चित्रकलेची खूप मदत होते.
अजित जगताप
चित्र काढताना तांत्रिक सुधारणेबरोबरच सर्जनशीलता जोपासण्यावरही भर देण्यात यावा, तसेच मुलांनी आपल्याला उत्तमोत्तम चित्र कसे काढता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी मुलांनी आपले चित्र खालील श्लोकाशी कसे समरूप करता येईल, हे पाहावे.
रूपभेदा: प्रमाणानि
भावलावण्य योजनम् ।
सादृश्यं वर्णिकाभंग
इति चित्र षडांगकम् ।।
या श्लोकामध्ये सुयोग्य चित्रासाठी आवश्यक असणारे सहा अंगे (घटक) सांगितली आहेत, या चित्रकलेच्या सहा अंगांच्या वापरामुळे आपले चित्र उत्तम, आकर्षक व उठावदार दिसेल.
रूपभेद
आपण आपल्या चित्रात ज्या आकृतींचा (मानवाकृती नैसर्गिक सर्जनात्मक आकार) वापर करणार आहोत, त्या आकृतींच्या रेखाटनातील बारकावे दाखवावेत.
आकृतीमधील बारकावे आपल्या चित्राला अधिक वास्तवता आणि सुंदरता प्राप्त करून देतात. बारकावे दाखवण्यासाठी आपली निरीक्षणक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे.
प्रमाण
हे दुसरे महत्त्वाचे अंग आहे. आपल्या चित्रात अधिकाधिक वास्तविकता येण्यासाठी आपले चित्र प्रमाणबद्ध असले पाहिजे.
चित्रात आपण जे आकार वापरणार आहोत, ते एकमेकांशी पूरक व प्रमाणबद्ध असावेत, जसे जवळच्या गोष्टी मोठ्या तर दूरच्या गोष्टी छोट्या दाखवाव्यात. आपल्या चित्रात जाड-पातळ, उंच-बुटका, मोठा-छोटा आदि भेद दाखवता येणे आवश्यक आहे.
भाव
आपल्या चित्रात भाव (Expressions) असणे हे परिपूर्ण चित्राचे लक्षण आहे. आपल्या चित्रातील विषयाच्या अनुषंगाने हसरा, दुःखी, आनंदी, आश्चर्यकारक आदी भाव आपण आपल्या चित्रात दाखवणे अपेक्षित आहे. चित्रातील भावदर्शनाला विशेष महत्त्व आहे. भावदर्शनामुळे चित्र बोलकी होतात.
लावण्ययोजना
चित्रात विषयाच्या गरजेनुसार लावण्य म्हणजे सुंदरता दाखविता यावी. चित्रात सुंदरता येण्यासाठी पोत (Texture) याचा वापर केला जातो. लावण्य योजनेमुळे आपले चित्र आकर्षक आणि सुंदर दिसते.
सादृश्य
सा-दृश्य म्हणजे जसे आहे तसे. आपण आपल्या चित्रात ज्या गोष्टी/वस्तू आकार चित्रित करणार आहोत ते जसे दिसतात, तसे काढण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या गुणात, रंगात, आकाराच्या प्रमाणात बदल करू नये.
वर्णिकाभंग
वर्णिकाभंग म्हणजे योग्य रंगसंगतीचा वापर. आपल्या चित्राचे रंगकाम करताना योग्य व विषयानुरूप रंगसंगती निवडावी, तसेच चित्रात योग्य रंगसंगतीबरोबरच फिक्कट-गडद रंगछटांचा वापर करावा.
रंगांच्या माध्यमातून चित्रातील आकृतीमध्ये वेगळेपण दाखवता येतो, तसेच चित्रात जवळ, दूर याचा आभास निर्माण करता येतो.
एकूणच वरील चित्रांच्या सहा अंगांचा वापर आपण आपल्या चित्रात केला, तर तयार होणारे चित्र हे नक्कीच हजार शब्दांपेक्षा बोलके असेल.
(लेखक कलाशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.