बिबट्या पिंजऱ्याबाहेर गेल्याच्या घटनेला अनेक तास उलटले. या गंभीर घटनेची माहिती मिळण्यास महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना १२ तासांपेक्षा जास्त कालावधी लागल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे स्मार्ट महापालिकेच्या प्रशासनातील असमन्वय अन् ढिसाळ कारभार समोर आला आहे.
प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी आणल्यानंतर त्यांना पुण्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही आठवडे विलगीकरण कक्षात ठेवले जाते. याच कक्षातून बिबट्या बाहेर पडला. माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्नात शोध मोहिमेत वेळ वाया घातल्याचेही समोर आले आहे. भारतीय सर्प विज्ञान केंद्राने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांना कळविले. त्यानंतर जाधव यांनी उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे यांना माहिती कळवली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली नसल्याचे समोर आले.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना संग्रहालयातून बिबट्या गायब झाल्याची माहिती सायंकाळी सातच्या सुमारास कळाली. त्यानंतर त्यांनी आयुक्तांना माहिती दिली. रात्री दहा वाजून गेल्यानंतरही बिबट्या सापडत नसल्याचे लक्षात आल्याने ढाकणे संग्रहालयात गेले. पहाटे पाचपर्यंत ते तेथील परिस्थिती हाताळत होते. सुदैवाने बिबट्या संग्रहालयाबाहेर गेला नाही. पण घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक होते.
जाधव म्हणाले, ‘‘मला सकाळी अकराच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर उद्यान अधिक्षकांना माहिती दिली. आम्ही शोध मोहिमेतच होतो.’’ घोरपडे म्हणाले, ‘‘सकाळी अकराच्या सुमारास माहिती मिळाली. अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना दुपारी कळविले होते. ढाकणे म्हणाले, ‘‘मला सायंकाेेेेेेळी सातच्या सुमारास माहिती मिळाली, त्यानंतर आयुक्तांनाही कळविले.’’
चौकशी करून कारवाई
बिबट्याला पकडून पिंजऱ्यात टाकण्याची मुख्य जबाबदारी महापालिकेवर होती. यात कोणाचे दुर्लक्ष झाले, निरोप का पोहोचवले नाहीत, संग्रहालय का सुरू ठेवले यासह अन्य कारणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
‘सचिन’चा मुक्त संचार
सुमारे दोन महिन्यांपूर्वी हंपी येथून ‘सचिन’ला कात्रज प्राणिसंग्रहालयात आणले. त्यामुळे त्याला मोकळ्या जागेत फिरण्याची, शिकार करण्याची सवय नाही. साडेसात वर्षांत प्रथमच बिबट्या ३६ तासांपेक्षा अधिक काळ मुक्त संचार करत होता.
सोमवारी रात्रभरात...
प्राणिसंग्रहालयात सोमवारी रात्री साडेआठपासून बिबट्याला पकडण्याचा हालचालींना वेग आला. सुरुवातीला संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व विद्युत दिवे बंद केले. अंधार झाल्याने बिबट्या खाण्यासाठी पिंजऱ्यात येईल, अशी अटकळ होती. पण दहापर्यंत शक्य झाले नाही.
दहा वाजता पिंजऱ्यांची संख्या वाढविली. मात्र त्यातही बिबट्या आला नाही.
प्राणिसंग्रहालयातील घनदाट झुडपांमध्ये तो जाऊन बसला. त्यामुळे त्याची हालचाल टिपणे शक्य होत नव्हते. त्यामुळे थर्मल कॅमेरे असलेले ड्रोन मागविण्यात आले. ते पहाटे पुण्यात पोहोचले.
संग्रहालयातील झुडपे काढण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास तीन बुलडोझर पाचारण केले.
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला हार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या सहा ठिकाणी नेम धरून कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवले होते.
रात्री अडीचपर्यंत बिबट्या नेमका कुठे आहे, याचा शोध लागला नाही.
बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहनतळाजवळ पहाटे पाच वाजता बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्यामुळे शोधकार्याला पुन्हा आणखी गती
देण्यात आली.
मंगळवारी सकाळी सूर्योदयापर्यंत बिबट्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
मंगळवारी दिवसभरात...
मंगळवारी प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
वनखात्याकडून आणलेले पिंजरे संग्रहालयात तैनात केले.
थर्मल ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोध कार्य दुपारपर्यंत सुरू होते.
वेगवेगळ्या ठिकाणांवर नवीन हालचाल टिपणारे मोशन कॅमेरे बसविले.
संग्रहालयात येणाऱ्या नाल्यांमध्ये जाळ्या टाकून बिबट्याचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद केले.
संग्रहालयातून बिबट्या नागरी वस्तीत जाण्याची शक्यता आहे ते सर्व मार्ग चेन टाकून बंद केले.
मादी बिबट्या असलेल्या पिंजऱ्याच्या जवळ नर बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले.
दिवसभर उन्हामुळे दाट झाडीत बसलेल्या बिबट्या पुन्हा दिसला नाही.
सूर्यास्तानंतर पुन्हा नव्या जोमाने शोधमोहीम हाती घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.