Pune Lockdown: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्याची तयारी केली जात आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत संचारबंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विवाह सोहळ्यांच्या समारंभात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे याबाबतही निर्णय घेण्यात आला असून आता लग्न समारंभासाठी फक्त 200 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तसेच याचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कोणताही लग्न समारंभ आयोजित करण्याआधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. लग्न समारंभाला होणारी गर्दी पाहता आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती, पण काही दिवसांपासून कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरु ठेवता येणार आहेत. याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शहरातील काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचा मेसेज व्हायरल केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. पण, शहरात कसल्याही प्रकारच्या लॉकडाऊन लागू करण्यात आला नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. असे खोटे मेसेज पाठवण्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पुणे प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय
-२८ तारखेपर्यंत कॉलेज-शाळा बंद
-खासगी शिकवणी बंद, पूर्वपरीक्षांचे क्लासेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार, याबाबत शुक्रवारी पुन्हा आढावा होईल
--हॉटेल, बार रात्री ११ वाजता बंद होतील
- रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून)
-रूग्ण सापडलेल्या दाट लोकवस्त्यांमध्ये टेस्ट, ट्रेसिंग वाढवणार
-लसीकरणाला प्राधान्य
-लग्न, कार्यक्रम, सरकारी, राजकीय सभांसाठी २०० परवानगी असेल. मात्र पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय मंगल कार्यालयात लग्न करता येणार नाही. त्यासाठी एक खिडकी योजना राहणार. कार्यक्रमांवर यत्रणा लक्ष ठेवणार.
-पुणे शहरात गरजेनुसार कोविड केअर सेंटर, जम्बो सेंटर सुरू केले जाईल
-संचारबंदी, हॉटेलबाबतची अंमलबजावणी सोमवारपासून होईल, तसे नवे आदेश काढले जातील.
-जीवनावश्यक वस्तू, विशेषत : भाजी पुरवठा, विक्रीवर बंधने नसतील, तो पुरवठा सुरळीत राहील. मात्र सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे; तशा सूचना व्यापारी संघटनांना करणार
-ग्रामीण भागांत प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुर करणार
-मायक्रो कंटेंमेंट तयार करणार
-अभ्यासिका सुरू राहणार, क्लासेस बंद-जिल्ह्यात लॉक डाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी
-200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम
-रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)
- मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा
- नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.