पुणे - पुणे - लोणावळादरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली, तर सुधारित अहवालास देखील नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. यानंतरही राज्य सरकारच्या दफ्तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्याप विचाराधीनच आहे.
या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च पाच वर्षांपूर्वी ४,८८४ कोटी रुपये इतका होता. तो आता ५१०० कोटी इतका झाला आहे. पाच वर्षांत प्रकल्पाची किंमत २१६ कोटी रुपयांनी वाढली. दोन डीपीआर सादर करूनही राज्य सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अद्यापही ‘साइड ट्रॅकवर’च ठेवले आहे.
राज्य सरकारने खोडा घातला
पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर सध्या दोन मार्गिका आहेत. रेल्वेने हा प्रकल्प स्वतः सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पात राज्य सरकारचा देखील हिस्सा असेल, अशी तयारी दर्शवली. एकूण खर्चात ५० टक्के खर्चाचा वाटा राज्य सरकारने उचलल्याने हा प्रकल्प मार्गी लावण्याची जवाबदारी ‘एमआरव्हीसी’ या संस्थेकडे सोपवली.
मात्र अद्यापही राज्य सरकारने त्याला ना मंजुरी दिली, ना निधी. राज्य सरकारने यातला सहभाग देखील अजून काढलेला नाही. राज्य सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकल्प मात्र रेंगाळला. परिणामी याच्या खर्चात कोट्यवधीने वाढ होत आहे. तर दुसरीकडे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी या बाबत आवाज उठवून हे काम मार्गी लावल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढेल शिवाय लोकलच्या फेऱ्या वाढण्यास देखील मदत होईल.
राज्य सरकारच्या सूचनेनंतर ‘एमआरव्हीसी’ने (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) सुधारित डीपीआर चार जुलै २०२३ ला सादर केला आहे. यात ५१०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. राज्य सरकारने मात्र अद्याप मंजुरी दिलेली नाही. राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच रेल्वे मंत्रालय मंजुरी देणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मंजुरीसाठी प्रतिक्षेच्या ‘ट्रॅकवरच’ अडकून पडला आहे.
नवी मार्गिका मेल एक्स्प्रेससाठी?
पुणे - लोणावळा दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिकांचा वापर लोकलसाठी करण्याचे नियोजन आहे. जेव्हा तिसरी व चौथी मार्गिका तयार होईल तेव्हा त्यावरून मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या धावतील. या बाबतचा अंतिम निर्णय रेल्वेचा परिचालन विभाग घेईल.
प्रवाशांना फटका
पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या तुलनेत मार्गिका नसल्याने रेल्वे गाड्यांना उशीर होणे, नवीन गाडी सुरू न होणे, लोकलला उशीर होणे व फेऱ्या न वाढविता येणे आदींचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका होणे अत्यंत आवश्यक आहे. गाड्यांची संख्या व मार्गिकांची क्षमता लक्षात घेता पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका फार आवश्यक आहे.
७९ - पुणे-मुंबई धावणाऱ्या रेल्वे
४२ - पुणे-लोणावळा लोकल
दीड लाखांहून अधिक दैनंदिन प्रवासी संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.