पुणे : 'कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही; परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी', अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी (ता.२७) केली.
कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी महापौर यांनी ही मागणी केली.
महापौर मोहोळ म्हणाले, 'पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसांत पीएमआरडीएच्या माध्यमातून ते उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात राज्य शासन ५०%, पुणे महानगरपालिका २५%, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका १२.५% आणि पीएमआरडीए १२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.'
'जम्बो आयसोलेशन सेंटर'ला राज्य शासन ५०% निधी देणार आहे, यासाठी राज्य शासनाचे धन्यवाद. परंतु गेल्या साडेचार महिन्यात पुणे महानगरपालिकेने २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. जम्बो आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी पुणे महापालिका निधी देण्यास नकार देणार नाही. परंतु पुढील काळात राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक रसद पुरवावी आणि महापालिकेला आर्थिक बळ द्यावे,' अशी मागणीही मोहोळ यांनी केली.
'शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील बेड्स आणि अवाजवी शुल्क आकारणी याबाबत आजही नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी राज्य शासनाने ताबडतोब योग्य ती कारवाई करावी. तसेच नागरिकांना काही खाजगी हॉस्पिटलमधून चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तरी यात राज्य शासनाने लक्ष घालून योग्य मार्ग काढावा, असेही मोहोळ म्हणाले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.