पुणे : मोबाईल चोरांची टोळी जाळ्यात

माहिती दिल्याबद्दल पोलिसांतर्फे फळविक्रेत्यास रोख बक्षीस
mobile thief
mobile thiefsakal
Updated on

पुणे : कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर सर्वासामान्य व्यक्ती तिथून निघून जाणे पसंत करते. स्वतःजवळ माहिती असूनही पोलिसांना मदत करण्याचे धाडस दाखविले जात नाही. मात्र, एका फळविक्रेत्याने पोलिसांना मोबाईल चोरट्यांची खबर दिली. त्यामुळे मोबाईल चोरी करणाऱ्या कर्नाटक येथील टोळीचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरट्यांकडून पावणेतीन लाख रुपयांचे १४ महागडे मोबाईल जप्त केले, त्याचबरोबर पोलिस उपायुक्तांनी खबर देणाऱ्या फळविक्रेत्याला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्याचा सन्मानही केला. मनोज काशिनाथ कासले, बालाजी धनराज कासले, शिलारसाहेब महम्मद इस्माईल सौदागर, शेरली चाँदसाहेब शेख (सर्व रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विमानतळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे तपास पथकाकडून मोबाईल चोरणाऱ्यांचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून त्यांचा शोध घेतला जात होता. विमाननगर येथील दत्तमंदिर चौकातील फळविक्रेते दत्ता भारत खाडे यांना पोलिसांनी ते सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविले. वाहनांवर नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी दिसल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्यास त्यांना सांगितले होते. त्यानुसार नऊ सप्टेंबर रोजी खाडे यांना दत्त मंदिर चौकातून नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी जाताना दिसल्या.

mobile thief
आटपाडी : शुध्द पाणी विट्याला लागते; आटपाडीला का नको?

त्यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तरुणांचा पाठलाग करून पकडले. तेव्हा, त्यांच्याकडे चोरी केलेले महागडे मोबाईल आढळून आले. आरोपी कर्नाटकचे आहेत. ते पूर्वी शिवाजीनगर परिसरात ज्यूस, फळे विक्रीची कामे करीत होते. लॉकडाउनमध्ये व्यवसायास फटका बसल्यानंतर त्यांनी मोबाईलचोरीचे गुन्हे करण्यास सुरवात केली.

अनेकदा गुन्हा घडल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यास कोणी पुढे येत नाही. मात्र एका फळविक्रेत्याने त्याच्याकडील माहिती पोलिसांना दिल्यामुळे मोबाईल चोरी करणारी टोळी पोलिसांना पकडता आली. सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्याकडील माहिती पोलिसांना दिल्यास गुन्हे उघड होण्यास मदत होईल.

- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.