Pune News: पुणे पुन्हा तुंबणार! महापालिकेच्या दाव्याची पोलखोल; ओढ्या-नाल्यांत अद्यापही राडारोडा तसाच पडून

पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक भागांतील नाल्यांची स्वच्छताच झाली नसल्याचे वास्तव आहे.
Pune Drainage
Pune DrainageSakal
Updated on

पुणे - पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक भागांतील नाल्यांची स्वच्छताच झाली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी केलेला महापालिकेचा दावा फोल ठरला असल्याचे चित्र ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोन्ही कामांसाठी स्वतंत्र निविदा काढल्या जातात. यंदाही अशाच प्रकारे सुमारे २० कोटी रुपयांची निविदा मलनिस्सारण विभागाकडून काढण्यात आलेली आहे. एप्रिलपासून कामाला सुरुवात झाली. हे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या. आतापर्यंत ९९ तक्रारी आल्या असून, त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण झाले आहे. तसेच शहरातील ९५ धोकादायक ठिकाणांची साफसफाई झाली आहे.

३८२ कलव्हर्ट व १८५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांमधील गाळ काढणे, खोलीकरण केले असल्याचेही प्रशासनाने सांगितले होते. ‘सकाळ’ने शहराच्या विविध भागांतील नालेसफाईची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी राडारोडा, कचरा, गाळ पडला असल्याचे दिसून आले. काही भागात तर नालेसफाई झालेलीच नसल्याने मोठा पाऊस झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नालेसफाई केवळ ठराविक भागात झाली आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका उद्‍भवू शकतो.

घोरपडी, वानवडी

  • घोरपडी परिसरात चार नाले आहेत. भैरोबानाला येवलेवाडी ते कोरेगाव पार्कपर्यंत वाहतो. हा परिसरातील सर्वात मोठा नाला आहे.

  • नाल्याची खोली कमी असल्याने पाणी नागरी वस्तीत घुसते.

  • विकासनगर परिसरात अतिक्रमण असल्याने पावसाळ्यात पाणी वाढल्यावर पूरस्थिती निर्माण होते.

  • सोपान बाग ते डोबरवाडीमार्गे कवडे मळापर्यंत ओढा वाहतो. त्यामध्ये कचरा, प्लास्टिक पडलेले आहे. इथे कोणत्याही प्रकारची साफसफाई झाली नाही.

  • हडपसर औद्योगिक परिसरातून कृष्णाईनगरमार्गे बी. टी. कवडे रस्त्यावरून पिंगळे वस्तीपर्यंत ओढा वाहतो. येथे साफसफाई केली जात नाही.

  • सर्व ओढ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अगदी उगमापाशी ओढा राहिला आहे, त्यामुळे दरवर्षी येथे काही वस्तीमध्ये पाणी घुसते.

  • मोरवाढा नाला सोलापूर रस्त्याजवळ सुरू होऊन नॅशनल वॉर परिसरापर्यंत आर्मी परिसरातून वाहतो. नाल्यावर सुंदर उद्यान बनवले असल्याने स्वच्छता होते.

  • वानवडी परिसरातून दोन नाले वाहतात. त्यांची सफाई व्यवस्थित न झाल्यास पाणी नागरी वस्तीत घुसते.

  • फातिमानगर येथे मोठ्या हॉस्पिटलने ओढ्याच्या जागेवर अतिक्रमण आहे.

  • वानवडी गावातून लहान ओढा सुरू होऊन जांभूळकर मळ्यापर्यंत वाहतो. अतिक्रमण झाल्याने केवळ नावाला ओढा शिल्लक आहे.

Pune Drainage
Pune News : बालवाडी शिक्षिका, सेविका पगाराच्या प्रतिक्षेत

हडपसर

  • हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ओढे-नाल्यांची संख्या : ६

  • ओढे-नाल्यांची एकूण लांबी : सुमारे १५ किमी

  • शेवाळेवाडी, मांजरी फार्म, भापकरमळा, वेलकम हॉल, आंबेकर मळा, चिंतामणीनगर, अल्हाटवस्ती आदी भागात काही प्रमाणात अर्धवट नालेसफाई

  • महंमदवाडी, वाडकरमळा, मंत्री मार्केट, माळवाडी, मगरपट्टा, कल्याणी स्कूल, लोहिया गार्डन, हिंणेमळा, हांडेवाडी रस्ता या भागात स्वच्छता आढळते.

  • वाडकरमळा, जाधवमळा, मगरपट्टा रस्ता, महंमदवाडी, ससाणेनगर-काळेबोराटेनगर रस्ता, मांजरी फार्म, माळवाडी, लोहिया गार्डनमागील भाग, हिंगणेमळा, कोंढवा आदी भागात अतिक्रमणे आहेत.

  • वाडकरमळा, जाधवमळा परिसरातील नागरिकांनी पुराचा धोका व्यक्त केला आहे.

बिबवेवाडी

  • बिबवेवाडी परिसरात तीन ओढे आहेत.

  • मुख्य अंबिल ओढा, गंगा धाम ओढा, महेश सोसायटी नाला.

  • अंबिल ओढ्यात इंदिरानगर येथे वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. येथे राडारोडा पडून आहे. पावसाळ्यात कचरा अडकून पुराची भीती आहे.

  • महेश सोसायटी नाल्यांची अप्पर ओटा परिसरात साफसफाई नाही, काही प्रमाणात काढलेला राडारोडा रस्त्यावर पडून आहे. अप्पर ओट्यावर ओढ्यावरील अतिक्रमणामुळे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पाणी नाल्याच्या बाहेर येते.

  • गंगाधाम परिसरात सोसायट्यांचे सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे कचरा साठून राहतो.

Pune Drainage
Pune Drought : खरीप हंगाम संकटात; पुणे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

कोथरूड

  • नाल्यांची संख्या : ६, क्षेत्र : १४८२५ मीटर

  • साफ केलेले क्षेत्र : १३६५०

  • स्वच्छ करायचे राहिलेले क्षेत्र : ११७५

  • ३२ पैकी ३० कल्व्हर्ट साफ केले आहेत.

  • पेठकर साम्राज्य येथील नाल्यात पत्रे, गादी असे साहित्य टाकल्याचे आढळले.

  • सुतारदरा नाला, सागर कॉलनी नाला, शिवनगरी हून जिजाई नगरीकडे जाणारा नाला, सिग्मावन सोसायटीच्या भागात अतिक्रमण आहे.

  • सागर कॉलनी, सुतारदरा, एकता कॉलनी (शिवतीर्थनगर जवळ), कोथरूड बस डेपोची मागील बाजू, बावधन, येथे नाल्याचे पाणी परिसरात शिरते.

  • एकता कॉलनी येथे सुरक्षा भिंत बांधल्यामुळे पावसाचे पाणी घरात घुसणार नाही.

  • सागर कॉलनी नाला येथे पाणी मागे फिरत असल्याने लालबहादूर शास्त्री कॉलनी भागात ओढ्या नजीकच्या घरांत पाणी शिरण्याची भीती आहे.

मुंढवा, खराडी, कोरेगाव पार्क

  • ताडीवाला परिसरात तीन नाले असून केशवनगर व मुंढवा सीमेलगतचा ओढा आहे.

  • कोरेगाव पार्कमध्ये दोन वाहते नाले आहेत. पालिकेने अद्याप त्यांची स्वच्छता केली नाही.

  • मुंढव्यातील सात ओढ्यांपैकी तीन ओढे पूर्णपणे बुजविले आहेत, तर काही बुजविण्याच्या तयारीत आहेत.

  • बधे वस्ती येथील निम्मा ओढा बुजविला जाऊन निम्मा वाहत आहे.

  • खराडी परिसरात पाच नाले आहेत. त्यातील काही नाले बऱ्यापैकी वाहिन्यांमध्ये बंदिस्त झाले आहेत. पाचही नाल्यांची स्वच्छता केली नाही.

Pune Drainage
Pune Crime : आमच्या एरियात भाजी विक्री करायची नाही म्हणत सराईत गुन्हेगारांकडून दोघांना बेदम मारहाण

महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व पावसाळी गटारांची सफाई झालेली आहे. नागरिकांकडून आलेल्या ९९ पैकी ८९ तक्रारींचे निवारण केले आहे. पावसाळ्यातसुद्धा ही यंत्रणा कार्यरत असणार आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

माहिती संकलन

कृष्णकांत कोबल, प्रयागा होगे, नितीन बिबवे, कैलास गावडे, जितेंद्र मैड, नीलेश बोरुडे.बाबा तारे, मोहिनी मोहिते, अन्वर मोमीन, शीतल बर्गे, रूपाली अवचरे, अभिजित कुचेकर, अशोक गव्हाणे, महादेव पवार, जागृती कुलकर्णी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.