महिला आरक्षणाची सोडत अवघ्या काही तासांवर आली असताना सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या मनातील धाकधूक वाढली आहे.
पुणे - महिला आरक्षणाची सोडत अवघ्या काही तासांवर आली असताना सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. ‘त्या’ २९ प्रभागात आपला प्रभाग नसावा, यासाठी अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले आहे. या सोडतीनंतरच कोणाला फटका बसणार आणि कोणाला प्रभाग बदलावा लागणार, यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुका या तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरात तीनचे एकूण ५७, तर दोनचा एक असे ५८ प्रभाग होणार आहे. २०११ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले. २०११च्या जनगणनेनुसार महापालिकेची सदस्यसंख्या ही १७३ असणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्यामुळे महिला सदस्यांची संख्या ८७ एवढी होणार आहे. त्यानुसार ५७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा महिलांसाठी तर एक जागा पुरुषांसाठी राखीव राहणार आहे. तर दोनच्या प्रभागात एक महिला आणि एक पुरुषांसाठी जागा राखीव राहणार आहेत. ८७ मधून ५८ महिलांसाठी जागा राखीव ठेवल्यानंतर उर्वरित २९ महिलांना लॉटरीपद्धतीने आरक्षण द्यावे लागणार आहे.
माजी नगरसेवकांवर टांगती तलवार
लॉटरी पद्धतीने २९ प्रभाग महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्या लागणार असल्यामुळे या प्रभागांमध्ये दोन महिला आणि एक पुरुष असे आरक्षण राहणार आहे. परिणामी २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार आली आहे. या सर्व नगरसेवकांना एकतर अन्य प्रभागात संधी शोधावी लागणार आहे अथवा कुटुंबातील वा पक्षातील महिला कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार आहे. याचा निर्णय मंगळवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता होणार आहे. या आरक्षणाची सोडत लॉटरी पद्धतीने असल्यामुळे अनेक इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
यापूर्वी २००२ मध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण होते. त्यामुळे महापालिकेत ४८ महिला प्रतिनिधी निवडून आल्या होत्या. २० वर्षांनंतर आता पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूका होत आहे. यंदा मात्र ५० टक्के महिला आरक्षण लागू असल्याने नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. महिला आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेक प्रभागातील चित्र काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे. तर किती मान्यवरांना हक्काचा प्रभाग सोडावा लागणार?, हे कळणार आहे.
पिंपरीत तिसऱ्या जागेवर ‘डोळा’
पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३१) महिलांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निवासस्थान असलेल्या पिंपळे गुरवमधील दोन्ही प्रभागांतील सोडतींकडे लागले आहे. कारण, येथील दोन्ही प्रभागांमधील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती व एक जागा अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित झाली आहे. त्या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास पुढील समीकरणे बदलणार आहेत. शिवाय, तिसऱ्या खुल्या जागांवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.