पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना कमी दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात एका संस्थेबरोबर करार केला आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून येथील १५ पैकी १३ मशिन बंद आहेत. महापालिकेने बिल न दिल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे. आरोग्य विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आता ही सेवा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र समोर आले आहे.
मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळेत औषधोपचार घ्यावे लागतात. सतत गोळ्या, औषधे घेतल्याने त्याचा परिणाम किडनीवर होऊन तिची क्रिया मंदावते. काही जणांची किडनी तर पूर्णपणे निकामी होते. रक्तातील घातक घटक काढून टाकण्यासाठी रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा, पंधरा दिवसांतून एकदा असे गरजेनुसार डायलिसिस करणे आवश्यक असते.
यासाठी खासगी केंद्रांवर २ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. हा खर्च गरीब नागरिकांना परवडणारा नसतो. त्यामुळे महापालिकेने सात वर्षांपूर्वी कमला नेहरू रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सौ. अरुणा नाईक डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी सुमारे ४० हजार रुग्णांचे डायलिसिस झालेले आहे.
महापालिका अंधारातच
गेल्या वर्षभरापासून या डायलिसिस केंद्रातील मशिन बंद आहेत. टेक्निशियन व नर्सची संख्या कमी असणे यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. पण असे असले तरीही रुग्णांनी तक्रार करेपर्यंत या ठिकाणच्या मशिन बंद आहेत, याबाबत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी अंधारातच होते. आता केंद्राची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांना देण्यात आले आहेत.
प्रशासकीय अडचणीच अडचणी
लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘महापालिकेने आमचे फेब्रुवारीपासूनचे सुमारे १५ लाख रुपयांचे बिल दिलेले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही १५ मशिन बसविल्या असल्या तरी इतर ठिकाणी सेवा सुरू झाल्याने ४-५ मशिनची गरज आहे. काही मशिन जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम सुरू आहे. हे केंद्र चांगल्या क्षमतेने चालविणार आहोत; पण यातील प्रशासकीय अडचणी दूर होणे आवश्यक आहे. हे काम आम्ही समाजसेवा म्हणून करत आहोत, आत्तापर्यंत ४० हजार जणांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे.
स्वच्छतेचा अभाव, एसी बंद
या ठिकाणी महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कार्ड काढल्यानंतर त्यातील लाभार्थ्याला केवळ ४०० रुपयांत हे उपचार मिळतात. तसेच याच योजनेतून डायलाइट ट्युबिंग आणि रक्तवाढीचे इंजेक्शन दिले जात असताना त्या खर्चातही बचत होते. हे केंद्र गरिबांसाठी वरदान ठरलेले असताना गेल्या वर्षभरापासून येथील यंत्रणा बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. येथील १५ मशिनपैकी केवळ २ मशिन सुरू आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. डायलिसिससाठी तासनतास बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय स्वच्छतेचा अभाव, एसी बंद असणे यामुळे रुग्णांना त्रास होत आहे.
कमला नेहरूमधील डायलिसिस केंद्राबाबत तक्रारी आल्या असून, त्यासाठी सहायक आरोग्यप्रमुखांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संस्थेचे बिल देण्याची प्रक्रिया सुरू असून, एक दोन दिवसांत पैसे जमा होतील. ज्या त्रुटी आहेत, त्यात सुधारणा केल्या जातील.
- डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महापालिका
कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस केंद्रातील मशिन बंद आहेत. ज्या चालू आहेत त्या सदोष आहेत. डायलिसिस करताना रुग्णांना थंडी वाजणे, हात पाय सुजणे असे त्रास होत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याची चौकशी केली असता, मोघम उत्तरे दिली जातात. महापालिकेने लक्ष घालून हे केंद्र बद पडण्यापासून वाचवावे, असे पत्र आरोग्यप्रमुखांना दिले आहे.
- उमेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.