पुणे महापालिकेच्या महात्मा फुले मंडईसह शहरातील ३२ मंडईतील गाळ्यांची भाडेवाढ करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली.
पुणे - पुणे महापालिकेच्या महात्मा फुले मंडईसह शहरातील ३२ मंडईतील गाळ्यांची भाडेवाढ करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. त्यामध्ये पूर्वी प्रति महिना ३२ रुपये भाडे होते, आता प्रति महिना ८४५ रुपये भाडे गाळेधारकांना द्यावे लागणार आहे. तसेच मंडईत ग्राहकांची गर्दी वाढावी यासाठी भाजी विक्रीसह इतर वस्तू विक्री करण्यासही परवानगी दिली आहे. तर कोरोना काळातील भाडे माफ करण्यात आले आहे.
महात्मा फुले मंडईमध्ये १ हजार ६०० गाळे आहेत. तर इतर ३१ मंडईमध्ये १ हजार ४०० गाळे आहेत. महापालिकेने २००४ मध्ये शेवटची भाडेवाढ करून तेथे प्रतिमहा ३२ रुपये भाडे निश्चीत केले. त्यानंतर भाडेवाढ केली नसल्याने महापालिकेचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सर्व मंडईचे मूल्यांकन करून घेऊन त्यांचे भाडे निश्चित केले आहे. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. त्यास आज मान्यता देण्यात आली.
मंडईच्या गाळाच्या मासिक भाड्याच्या वाढीसाठी नवीन मूल्यांकनानुसार टप्पे ठरवले असून, २०२१ ते २०२५ पर्यंत पाचपट, सहापट, सातपट आणि आठपट असे भाडे आकारले जाणार आहे, तर २०२५-२६ पासून दरवर्षी १२ टक्के भाडेवाढ केली जाणार आहे. तसेच २०२१-२२ पासून ३० वर्षांसाठी गाळा देण्याचा करार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अशी होणार भाडेवाढ
- २०२१-२२ ला पाचपट भाडेवाढ - ५२७ रुपये प्रतिमहा
- २०२२-२३ ला सहा पट भाडेवाढ -६३४ रुपये प्रतिमहा
- २०२३-२४ ला सात पट भाडेवाढ - ७३९ रुपये प्रतिमहा
- २०२४-२५ ला आठ पट भाडेवाढ - ८४५ रुपये प्रतिमहा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.