पुणे - ‘रंगीबेरंगी सलवार, कुडते, पॅन्ट, शर्ट शिवून ग्राहकांच्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या टेलरचे दुकान पुरात बुडाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले अन् त्यांच्या जगण्याचा ‘धागा’च उसवला. मुठा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता पुन्हा आयुष्याची नवी सुरुवात करण्याचे आव्हान या टेलरपुढे आहे.
संदीप मघडंबर असे या टेलरचे नाव आहे. मघडंबर यांचे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये सार्थक एन्टरप्रायजेस नावाने दुकान आहे. गुरुवारी (ता. २५) पहाटे अचानक एकता नगरीमध्ये पुराचे पाणी शिरले. काही वेळातच त्यांचे दुकानही या पुरामध्ये बुडाले. मघडंबर यांना त्यांचे दुकान बुडाल्याचे कळल्यानंतर त्यांनी तेथे पोहचण्याची धडपड केली.
पण पाण्याची पातळी जास्त असल्याने हताश होऊन त्यांना पाणी कमी होण्याची वाट पहावी लागली. सकाळी दहा वाजेनंतर पाणी कमी झाल्यानंतर संदीप व त्यांच्या कुटुंबीयांनी दुकानाकडे धाव घेतली. शटर उघडताच, त्यातून बाहेर आलेले पाणी आणि चिखल बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शिवलेले कुडते, सलवार, पॅन्ट, शर्ट पूर्णपणे ओले झाले होते. तर जे कापड शिवण्यासाठी देण्यात आलेले होते ते चिखलाने बरबटलेले होते.
एकता नगरीमध्ये पूर आल्याचे व्यावसायिकांना कळाल्यानंतर त्यांना अनेकांनी फोन करून आम्हाला आमचा माल व्यवस्थित पाहिजे, असे सांगितल्याने गाळात रुतलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे मोठे आव्हान मघडंबर यांच्यासमोर आहे.
मी शून्यातून माझा व्यवसाय सुरू केला होता. अनेकांनी कापड आणून दिले होते. अनेकांचे कपडे शिवून झाले होते. पण एका पावसात माझा व्यवसाय, संसार उघड्यावर आला आहे. पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे माझ्यापुढे आव्हान आहे.
- संदीप मघडंबर, टेलर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.