जुन्नर - खोल दरीतून घाट माथ्यावर येणारे दाट धुके, अंगाला झोबणारा थंड वारा व कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत ऐतिहासिक नाणेघाटात शनिवार ता.१५ व रविवारी ता.१६ रोजी सुट्टीच्या दोन दिवसात सहा हजाराहून अधिक पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटला.
घाटघर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने उपद्रव शुल्क नाक्यावर दोन दिवसांत बाहेरगावहून आलेल्या १,०९२ दुचाकी व ८५८ चारचाकी अशा एकूण १,९५० वाहनांची नोंद झाली आहे. या वाहनातून सुमारे सहा हजार ६५७ पर्यटक आले.
त्यांच्याकडून ६६ हजार ५७० रुपये उपद्रव शुक्ल वसूल करण्यात आले. या उपद्रव शुल्काच्या रकमेतून गावातील तरुणांना रोजगार तसेच येथील जैवविविधता जोपासणे व परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.
आषाढ महिन्याचा शेवटचा शनिवार,रविवार असल्याने तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेला पाऊस व माळशेज घाटात पर्यटकांना घातलेली बंदी यामुळे नाणेघाटात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सांगण्यात आले.गर्दीमुळे येथील हॉटेल व्यवसायिकांना चांगला व्यवसाय झाला.
दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची पावले नाणेघाटाकडे वळतात.येथील ब्रिटीश कालीन फडके बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. बंधाऱ्याच्या खाली केलेल्या पायऱ्या वरून फेसाळत वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यात बसण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. भातखाचरे पाण्याने भरली आहेत अशा निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे,नाशिक,नगर येथून सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे आपटाळे त नाणेघाट रस्त्यावर ठिकठिकाणी पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अशात रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात वाहने फसल्याने मनस्ताप सोसवा लागला या मार्गचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी घाटघरचे सरपंच मनोज नांगरे माजी सरपंच पोपट रावते, पेसा अध्यक्ष अनिल रावते, तंटामुक्ती अध्यक्ष राघू रावते यांनी केली आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ता.५ जुलै पासून उपद्रव शुल्क आकारणी सुरू केली. घाटघर परिसरात मद्यपानाला बंदी घालण्यात आली. सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.हुल्लडबाजांकडून पर्यटकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.