नवले पुलावर वारंवार घडणारे अपघात व त्यामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे.
पुणे - नवले पुलावर वारंवार घडणारे अपघात व त्यामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या आठ दिवसात संबंधित आराखडा तयार करुन, उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यात भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे या परिसरातील अपघात कमी होण्यास मदत होईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल या दरम्यानच्या महामार्गावर रविवारी तीन मोठे अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यु झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही गांभीर्याने दखल घेत विविध विभागांना तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले होते. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्तालयात सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यामध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे (एनएचआयए) प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेच्या वाहतूक शाखेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बैठकीत अपघात रोखण्यासाठी दीर्घ कालीन आणि अल्पकालीन उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे.
बैठकीनंतर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी गुप्ता म्हणाले, 'आम्हाला नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत. पुर्वी केलेल्या उपायोजनामुळे गेल्या सहा महिन्यात येथील अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा एकदा अपघातांची संख्या वाढत आहे. पाययोजना करुनही अपघात कमी होत नसल्याने दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यापुर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघात कमी झाले होते, आता अपघातात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपायोजना राबविण्यात येणार आहेत.'
ट्रक बंद करून चालविल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती
ट्रक चालकाने डिझेल वाचविण्यासाठी उतारावर ट्रक बंद करुन चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने संबंधित ट्रकने अनेक वाहनांना उडविल्याची प्राथमिक माहिती तपासातुन पुढे आली आहे. ट्रकचालक फरार असून तो सापडल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा आहेत उपाययोजना
- जाड थराचे व कमी अंतर असणारे रम्बलर्स तयार करणे, त्याची सतत देखभाल दुरुस्ती करणे
- मुख्य उतार कमी करणेबाबत उपाययोजना करणे
- स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल दरम्यानचा तीव्र उतार कमी करणे
- ठिकठिकाणी रिफलेक्टर बसविणे
- जड वाहनांचा वेग टप्प्याटप्प्याने कमी करणे
- सेवा रस्ता रुंदीकरण, दुरुस्ती व अतिक्रमणे काढणे
- नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंत वेग कमी करण्याबाबतची उद्घोषणा करणारी यंत्रणा बसविणे
- जड वाहनांची वेगमर्यादा 40 पर्यंत कमी करणे
- बोगद्यापासून ठिकठिकाणी स्पिड गन, सीसीटीव्ही बसविणे
- नऱ्हे सेवा रस्ता व महामार्गाला मिळणाऱ्या सर्व छोट्या रस्त्यांवर रम्बलर्स स्ट्रिप बसविणे
- रस्त्यावर पथदिवे बसविणे, सेल्फि पॉईंट हटविणे
- नागरीकांचा रस्त्यावरील वावर कमी करणे
- महामार्गावरील फलक स्पष्ट दिसण्यासाठी उपाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.