Ajit Pawar News - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२२-२३ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम दर ३४११ रुपये प्रतिटन इतका जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा ५६१ रुपये अधिक मिळणार आहेत, तर गेटकेनधारक शेतकऱ्यांना ३१०० रुपये प्रमाणे अंतिम ऊस बिल आदा होणार आहे.
सध्याला एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात `माळेगाव` राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांनी स्पष्ट केली.
`माळेगाव`ने गतवर्षीच्या हंगामात १२ लाख ५७ हजार ४६५ में.टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ७ लाख २६ हजार, तर गेटकेनधारकांचा ५ लाख ३३ हजार में.टन उसाचे गाळप केले होते. तसेच ११.८१ टक्के रिकव्हरीनुसार १३ लाख २८ हजार ९०० क्विंटल साखर निर्मिती केली होती. सहविजनिर्मितीतून ५ कोटी ४९ लाख ७० हजार युनिटची वीजविक्री केली,
तर डिस्टलरीतून २ कोटी १७ लाख ८० हजार लिटर अल्कोहोल व १ कोटी ८३ लाख ४२ हजार लिटर इथेनाॅल निर्मिती केली होती. माळेगावची एफआरपी २८५१ प्रतिटन इतकी असून आत्तापर्यंत सभासदांना एफआरपी व १०० रुपये कांडेपमेंटसह २९५१ रुपये दिले आहेत. आता उर्वरित प्रतिटन ४६० रुपये इतकी समाधानकारक रक्कम आगामी काळात सभासदांना मिळणार आहे, तर गेटकेनधारकांना याआगोदर दिलेली २८५१ रुपये वगळता उर्वरित २४९ रुपये मिळणार आहेत.
अजितदादांचा शब्द खरा केला...
अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत माझ्या नेतृत्वाखालील काम करीत असलेला माळेगाव कारखाना सोमेश्वरच्या ३३५० रुपये ऊस दरापेक्षा निश्चितपणे अधिकचा दर देईल,असे सांगितले होते. त्यामुळे माळेगावच आपला चार वर्षांपुर्वीचा ३४०० रुपये ऊस दर दिल्याचे रेकार्ड यंदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोडेल का ? अशी जबरदस्त चर्चा सर्वत्र होती.
अर्थात अजितदादांचा तो शब्द खरा करीत माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी बुधवारी सभासदांना ३४११ रुपये दर जाहिर केला. तसेच सोमेश्वरपेक्षा ६१ रुपये अधिकचे दिले. यापुढील कालावधीतही माळेगावची उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राहील,`` अशी ग्वाही संचालक योगेश जगताप यांनी दिली.
३४०० रुपयांचे रेकाॅर्ड कसे मोडले ?
गतवर्षी सहविजनिर्मिती व डिस्टलरी प्रकल्पातून सुमारे ५४ कोटींचा नफा झाला, साखर विक्रीच्या सरासरीत सुधारणा, दैनंदिन खर्चात कपात, ऊस वाहतूक खर्चात बचत, सहविजनिर्मितीतून ५ कोटी ४९ लाख ७० हजार युनिटची वीजविक्री, डिस्टलरीतून २ कोटी १७ लाख ८० हजार लिटर अल्कोहोल निर्मिती व १ कोटी ८३ लाख ८२ हजार लिटर इथेनाॅल निर्मिती झाली.
परिणामी सन २०१९-२०२० च्या ३४०० रुपये ऊस दराचे रेकार्ड यंदा बाळासाहेब तावरेंनी मोडले. याशिवाय विरोधकांच्या काळातील चार वर्षाच्या दराची तुलना केली, तर माळेगावने आजवर ९५१ रुपये प्रतिटन अधिकचे दिलेत, अशी माहिती संचालक अनिल तावरे यांनी स्पष्ट केली.
अध्यक्षांचे उसाबाबत आवाहन...
ज्येष्ठनेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा उत्तम कारभार झाल्याने चांगला दर देऊ शकलो. विशेषतः अजितदादांचे मार्गदर्शन आणि दैनंदिन खर्चातील काटकसरीमुळे हे शक्य होत आहे. त्या प्रक्रियेत मावळते कार्य़कारी संचालक राजेंद्र जगताप यांच्यासह अधिकारी व कामगारांचे योगदान महत्वपुर्ण ठरते. आगामी काळातही चांगला दर देणार असून शेतकऱ्यांनी ऊस देताना माळेगावला पसंती द्यावी, असे आवाहन माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.