संगणकही देईल चांगली संधी

संगणकही देईल चांगली संधी
Updated on

सध्याच्या संगणक, माहिती-तंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. खरंतर संगणक व संगणकावरील विविध प्रणाली वापरणे किंवा हाताळणे याचा अर्थ संगणक क्षेत्रात उत्तम करिअर करता येईल, असा होत नाही. दहावी, बारावीनंतर संगणक क्षेत्रात कल असणाऱ्या पाल्यांपुढे कोणते पर्याय असू शकतात, ते आपण थोडक्‍यात जाणून घेऊ...

दहावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी या दोन पदविका अभ्यासक्रमांचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो. डिप्लोमानंतर बीई अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो; पण त्यासाठी डिप्लोमा अभ्यासक्रमास ७० टक्‍क्‍यांहून अधिक गुण असल्यास चांगल्या महाविद्यालयाचा पर्याय मिळतो. तुलनेने द्वितीय वर्षाच्या जागा अभियांत्रिकी महाविद्यालयात कमी उपलब्ध असतात व त्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा निकालावरून ठरतात.

त्यामुळे काही वेळेस डिप्लोमाला चांगले गुण मिळूनही पसंतीचे/आवडीचे महाविद्यालय मिळणे अवघड जाते. अशा प्रसंगी काही विद्यार्थी बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश न घेता प्रथम वर्षाच्या पर्यायाचा विचार करतात; पण त्यामध्ये त्यांचे एक वर्ष वाया जाते वा जास्तीचे लागते. डिप्लोमानंतर बीएस्सी कॉम्प्युटर, बीसीएचा पर्यायदेखील पदवीधर होण्यासाठी उपलब्ध असतात.

एसएससीनंतर परंपरागत अकरावी, बारावी करण्याचा पर्याय निवडल्यास विज्ञान शाखेअंतर्गत कॉम्प्युटर किंवा माहिती तंत्रज्ञान द्विलक्षी अभ्यासक्रमाचे पर्याय असतात. वाणिज्य शाखेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान हा एक विषय निवडता येतो. एचएससी विज्ञान शाखेतील संगणक, इलेक्‍ट्रॉनिक शास्त्र हे पर्यायी विषय निवडल्यास १२ वीनंतर पदवीच्या पदविकेच्या थेट प्रवेश घेता येतो; तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने हे ज्ञान उपयोगी ठरते. 

बारावी विज्ञान शाखेअंतर्गत पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्राशी संबंधित बीई संगणक, माहिती-तंत्रज्ञान, बीएस्सी माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, बीसीए सायन्स या अभ्यासक्रमांचे पर्याय असतात.

संगणकशास्त्र व गणित या दोन्ही विषयांचा अतिशय जवळचा संबंध असतो. बीएस्सी ॲनिमेशन या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना जाहिरात, मोबाईल गेम, मोबाईल ॲप, ई-लर्निंग साहित्य, ग्राफिक्‍स या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मुळात चित्रकलेची आवड असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

बारावी वाणिज्य व कला या शाखेअंतर्गत पूर्ण केल्यानंतर बीबीए कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुला असतो. वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम उपयुक्त व महत्त्वाचा ठरतो.

संगणक क्षेत्राशी संबंधित बीई कॉम्प्युटर/आयटी हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमई, एमएस, एमएस्सी संगणकशास्त्र, एमसीए, एमबीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असतात. बीएस्सी संगणकशास्त्र, बीएस्सी ॲनिमेशन, बीसीए सायन्स हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करून संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत.

संगणकीकरण, भ्रमणध्वनीमुळे झालेली क्रांती, जागतिकीकरणामुळे झालेले बदल, कालानुरूप बदल, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, समाजातील आव्हाने, ई-कॉमर्स, एमकॉमर्स, डिजिटल इंडिया, वेबवर आधारित ॲप्लिकेशन, इंटरनेट तंत्रज्ञान, नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल ॲप, गेम, सायबर सुरक्षा, नेटवर्किंग, त्याचे व्यवस्थापन; तसेच सेवा क्षेत्रात यासंबंधीच्या गरजेप्रमाणे लागणाऱ्या संगणक प्रणाली विकसित करणे व त्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे व दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.