Hadapsar News: मागील तीन-चार दिवसांत वादळ वाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाने मांजरी - हडपसर परिसरातील विविध भागात दैना उडवली आहे. झाडपडी, रस्त्यांवर साचणारे पाणी, त्यामुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे प्रवासी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
दिवसभर उकाडा आणि सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणारा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसाळी वाहिन्या तुंबून ठिकठिकाणचे रस्ते, चौक, चाळी, सोसायट्यांमध्ये पाणी साठून राहिले. वीजवाहिनी तुटून व उघड्या डीपी बॉक्स मध्ये पाणी जाऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत ठिकठिकाणी अशा घटना घडल्या.
बनकर उद्यानातील दोन झाडे पडली. हिंगणेमळा येथे उच्चदाब वीज वाहिनीवर झाड पडल्याने त्याने पेट घेतला. आकाशवाणी केंद्राजवळ झाड पडले. ससाणेनगरच्या सात क्रमांकाच्या चाळीत झाड पडून घरांचे नुकसान झाले. महेश ससाणे व उल्हास तुपे यांनी कार्यकर्त्यांसह अग्निशमन दलाला मदतकार्य करून झाड दूर केले.
महंहमदवाडी परिसरातील हेवनपार्क, विलास पेट्रोल पंपाजवळ वानवडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळले. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होऊन कोंडी झाली होती. कलेश्वर घुले व हिंगुलांबिका सोसायटीमधील कार्यकर्त्यांनी दोन तास मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली. रासगे आळी, गरूडवस्ती येथे वीजेच्या डीपीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
भोसले गार्डन येथे झाड कोसळले होते. कार्यकर्त्यांनी वाहनाला बांधून ते रस्त्यातून दूर केले. एनआयबीएम रस्ता, डीपीएस शाळा व गंगा व्हिलेज सोसायटी समोर वाहनांवर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. पालिका प्रशासन व कार्यकर्त्यांनी पडलेली झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला. मांजरी परिसरात मुंढवा रस्त्याचे काम रखडल्याने ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साठून राहत आहे.
मांजरी रस्त्यालगतच्या कल्याणी शाळेजवळ तसेच भापकर मळा रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता बंद झाला होता. अजित घुले यांनी प्रशासनाशी संपर्क साधून ते हटविले. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. घुले वस्ती येथे दिलीप टकले यांच्या घराजवळ झाड वाकल्यामुळे मोटार वाहनांचा रस्ता बंद झाला होता. त्यातच येथील बेबी कालव्यावरील रस्ता खचलेला आहे. त्याभोवतीच्या संरक्षक जाळ्याही तुटलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मांजरी गावठाणात पाण्याच्या टाकीजवळील झाडाची मोठी फांदी तुटून पडली.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकावेळी घडत असलेल्या या घटनांमुळे मदत कार्य करताना प्रशासकीय यंत्रणांची मोठी दमछाक झाली. अग्निशमन दल, वीजवितरण कंपनी, वाहतूक पोलीस, उद्यान विभाग, झाडपडी विभाग यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्ररात्रभर धावपळ करावी लागली. त्या त्या भागातील स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला या कामात मोठी मदत केली.
"सोमवारी (ता. २०) शहरात मोठ्याप्रमाणात झाडपडीच्या घटना घडल्या. सकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत केवळ अग्निशामक दलाकडे एकूण ६९ झाडपडी बाबतच्या तक्रारी आल्या होत्या. त्याच पध्दतीने इतर विभागालाही तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे या घटनांचा अकडा शेकडोत गेला असेल. दिवसभराच्या तुलनेत रात्रीच्या सुमारास झाडपडीच्या घटना अधिक होत्या.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.