पुणे : राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोन फरारी दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. ते एप्रिल २०२२ पासून पुण्यातील कोंढवा परिसरात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी वाहन चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर तपासात ही बाब उघड झाली. न्यायालयाने दोघा आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकू साकी (वय २४, दोघे रा. मीठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास कोथरूड पोलिस ठाण्यातील बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन हे गस्तीवर होते.
त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरी करताना तीन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींना घरझडतीसाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. परंतु त्यांचा साक्षीदार महम्मद शाहनवाझ आलम (वय ३१) हा पसार झाला.
पोलिसांनी कोंढव्यातील त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात एक जिवंत काडतूस, दुचाकी चोरीचे साहित्य, चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यावरून त्यांचा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आला. पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) कळविली. एटीएसचे पथक कोथरूड पोलिस ठाण्यात आले.
त्यानंतर दोघांना शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेत नेण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा आरोपी हे मूळ मध्यप्रदेश येथील असून, त्यांचा राजस्थानच्या चितौढगडमधील एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे एक वर्षापूर्वी त्याठिकाणी स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात दोघा संशयितांना एनआयएने फरार घोषित केले होते.
जयपूरमध्ये रचला घातपाताचा कट
राजस्थानमधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता. या कटाची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने या तिघा दहशतवाद्यांवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’ शी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पुण्यात घातपाताचा संशय ?
दहशतवादी कोणत्या उद्देशाने पुण्यात थांबले होते, त्यांचा कोठे घातपात करण्याचा विचार होता का, याबाबत पुणे पोलिस तपास करीत आहेत. हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात येईल. दहशतवाद्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना एनआयएकडून जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस मिळेल. शिवाय, पुणे शहर पोलिस दलाकडूनही दोन पोलिसांसह पथकातील कर्मचाऱ्यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. शहरात सध्या नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यामुळे हे दहशतवादी पोलिसांच्या हाती लागल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
असे पकडले गेले दहशतवादी
पोलिस बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन हे पहाटे शास्त्रीनगर चौकीच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यांना दुचाकी चोरताना तिघे संशयित आढळून आले. त्यांनी ही बाब पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांना कळवली. त्यानंतर पोलिस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांच्या पथकाने आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिस तपासात ते दोघे संशयित दहशतवादी असल्याचे समोर आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक आणि परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या हस्ते ही कामगिरी बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.