Pune News : खरे हिंदू जिजाऊ अन् फुले; पुण्यातील कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांचं विधान

Jijau Death Anniversary
Jijau Death Anniversary
Updated on

पुणे : पहाटेच्या ‘अज़ान’ला विरोध म्हणून हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांची वैचारिक सुन्ता झाली आहे. तर वाढदिवसाला केक कापणाऱ्यांची बौद्धिक ‘बपतिस्मा’ झाली आहे. धर्माला धर्माने उत्तर द्यायचे नसते तर विवेकाने लढायचे असते. म्हणूनच सती न जाणाऱ्या जिजाऊ साहेब आणि समाजसुधारक महात्मा फुले खऱ्या अर्थाने हिंदू आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले.

शिवपुत्र महोत्सव पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराव बोलत होते. शिवस्फुर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती व शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवपुत्र छत्रपती संभुराजे पुरस्काराने लेखक डॉ.अशोक राणा, महाराणी ताराराणी पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पवार यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक आणि ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक दत्तक योजनेतील विद्यार्थ्यांना धनादेश सुपूर्त करण्यात आले. तसेच शिवपुत्र संभाजी, बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

तर डॉ. राणा लिखित अस्त्याची सत्यकथा आणि सणांची सत्यकथा या पुस्तकाचे पुर्नप्रकाशन करण्यात आले. महाराव म्हणाले,‘‘सत्य दाबता येत नाही. तर जो असत्य हिमतीने सांगतो तोच खरा सत्यशोधक आहे. आपल्याकडे लोकांना निर्बुद्ध बनविण्याचे काम केले जाते. लोक आजही सुधारत नसून, देव जागृत झालेत अन् माणसे झोपली आहेत.’’ देशाच्या वैचारिक दयनीय अवस्थेवर महाराव यांनी कोरडे ओढले.

एकविसाव्या शतकात पुरोगामी संघटना फुले, शाहु आंबेडकरांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाल, ‘‘विज्ञानवादा ऐवजी आपण आता आपण धार्मिकतेकडे वाटचाल करत आहोत. देशात विषमतावादी लोकांच्या विचारांना जास्त मान्यता मिळत आहे. पुरोगामी विचारांचा वाईट काळ आला असून, आज ही बीजे आपण जोपासली पाहिजे. याला अंकुर केव्हा फुटेल मला माहीत नाही.’’

बहुजन महानायकांना योजनाबद्ध पद्धतीने बदनाम करण्यात आल्याचे डॉ. राणा यांनी सांगितले. तर महाराणी ताराबाईंच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याचे विशेष महत्त्व असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘आरक्षण नव्हतं तेव्हा जीजाऊंपासून ते सावित्रीबाईंपर्यंत अनेक महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले. समाजमान्यता मिळवली. त्यांनी निर्माण केलेल्या इतिहासाच्या पावलावर आपल्याला चालावे लागेल.’’

पुराणांतून बाहेर पडा...

तेच तेच वाचूनही आपल्या बुद्धीला गंज चढलेला आहे. स्वतःलाच समजणे म्हणजे प्रबोधन होय. बळिराजा मानला म्हणजे वामन मानावाच लागेल. लोकांना पुराणातून बाहेर काढत मानवी जीवनाचा इतिहास लोकांपर्यंत पोचवायला हवा, असे मत ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांप्रमाणे महाराणी ताराराणींनाही आपण छत्रपती म्हणायला हवे, असेही महाराव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.