Antigen Kit : अँटिजन कीट घोटाळ्यात अधिकाऱ्यांची चूक; पोलिसांकडून होणार चौकशी

कोरोनाच्या काळात ही साथ नियंत्रित करण्यासाठी रॅपिड अँटीजन कीटद्वारे कोरोनाच्या चाचणीवर भर देण्यात आला होता.
Rapid antigen testing
Rapid antigen testingsakal
Updated on
Summary

कोरोनाच्या काळात ही साथ नियंत्रित करण्यासाठी रॅपिड अँटीजन कीटद्वारे कोरोनाच्या चाचणीवर भर देण्यात आला होता.

पुणे - वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यात कोरोना काळात रॅपिड अँटिजन कीटमध्ये घोटाळा झाला असून, गोपनीय अहवालात तसे स्पष्ट नमूद केले आहे. त्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज दुजोरा दिला. त्यामुळे आता या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.

कोरोनाच्या काळात ही साथ नियंत्रित करण्यासाठी रॅपिड अँटीजन कीटद्वारे कोरोनाच्या चाचणीवर भर देण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये बारटक्के दवाखान्यात अँटिजन कीटचा वापर करण्यात आला. त्यामध्ये रुग्णालयाला देण्यात आलेल्या १८ हजार ५०० ॲंटीजेन कीटपैकी सुमारे ६० टक्के रुग्णांची बोगस नोंदणी केली व या कीट खासगी लॅबला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

यासाठी चाचणी केलेल्या नागरिकांच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या होत्या. यात अनेक परप्रांतीय नागरिकांचे नंबर देण्यात आले. इतर तपासणी केंद्रांवर नागरिकांनी चाचणी केली असली तरी त्यांनी बारटक्के दवाखान्यात तपासणी केल्याचे दाखवण्यात आले. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार महापालिकेचे डॉ. सतीश कोळसुरे यांनी केली होती.

पण आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कोळसुरे यांनी याविरोधात मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यातच वारजे पोलिसांनी या प्रकरणात तपास करून ६० टक्क्यांहून अधिक नोंदी खोट्या असल्याची शक्यता वर्तवली व त्याचा अहवाल आरोग्य प्रमुख, महापालिका आयुक्तांना पाठवून चौकशी करण्याची सूचना देली. त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली. दोन महिने उलटून गेले तरी त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाला नाही. प्रसारमाध्यमांनी हा विषय चव्हाट्यावर आणल्यानंतर अखेर चौकशी समितीने आयुक्तांकडे दोन आठवड्यापूर्वी हा गोपनीय अहवाल सादर केला. पण त्यावर लगेच कारवाई झाली नाही. विधिमंडळ अधिवेशनातही त्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

‘आरोग्य विभागाचा चौकशीचा गोपनीय अहवाल पाहिला. त्यात रॅपिड अँटिजन कीटच्या नोंदी जास्त झाल्या आहेत, यात प्रशासनाची चूक असल्याचे स्पष्ट आहे. पण यात नेमका आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का याची चौकशी पोलिस उपायुक्तांकडून केली जाईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

पोलिसांच्या चौकशीत ६१ टक्के नोंदी बोगस

वारजे पोलिसांकडे याची तक्रार गेल्यानंतर त्यांनी १६५ नोंदीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केवळ १८ जणांची टेस्ट केल्याचे समोर आले. ३७ जणांशी संपर्क होऊ शकला नाही. ९ जणांनी फोन उचलला नाही या सर्वांची संख्या ६४ इतकी येते. तर दुसऱ्या ठिकाणी केलेल्या टेस्ट २४, टेस्ट केलीच नाही १५, पुण्यात कधीच आलो नाही असे सांगणारे ९, दुबार टेस्ट केली नाही २३, पेशंटला ओळखत नाही ७ आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे २३ फोन नंबर यामध्ये निघाले, असे १०१ संपर्क क्रमांक बोगस आहेत. म्हणजे ६१ टक्के नोंदी निघाल्या आहेत.

त्यामुळे एकूण १८ हजार ५०० कीटमध्ये किमान ११ हजार ३२४ कीटची नोंद बोगस असल्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रत्येक कीट ३०० रुपये प्रमाणे विकून ३३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा काळाबाजार झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे वारजे पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.