जुन्नर - आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुकडेश्वर येथील शिवालय गेल्या सहा-सात वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळत आहे.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरावर प्लास्टिक ताडपत्री कागद टाकून पावसापासून संरक्षण करण्यात येत आहे. शिवालयाची गळती थांबविण्याची भाविक आणि ग्रामस्थांची मागणी आहे.
बाराव्या शतकातील मंदिर
पूर (ता. जुन्नर) येथे कुकडी नदीच्या तीरावरील हेमाडपंती शैलीतील कुकडेश्वर मंदिर १२व्या शतकातील शिवालय आहे. प्रत्यक्षात इ.स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो.
मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवरील असलेल्या कोरीव काम आणि शिल्पांसाठी ते प्रसिद्ध आहे. पुरातन कुकडेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे त्याची मालकी राज्य पुरातत्त्व विभागाकडे आहे.
पर्यटकांकडून नाराजी
कुकडी नदीचे उगमस्थान व स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येत असतात. श्रावणात महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात, परंतु मंदिरात पाणी गळत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करतात.
ताडपत्रीमुळे पावसाचे पाणी गळणे थांबत असले, तरी मंदिराच्या हस्तकलेचे व विविध शिल्पकलेचे दर्शन घडतं नाही म्हणून पर्यटक आणि इतिहासप्रेमी नाराजी व्यक्त करतात. यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ठोस पावले उचलली जाणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
‘विघ्नहर’कडून ९० लाखांचा खर्च
कुकडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ९० लाखांहून अधिक आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. त्यातून पुरातत्त्व विभागाने सन २०१३-१४ मध्ये मंदिराचे काम पूर्वी होते तसे करून दिले.
मात्र, कळसाचे काम न झाल्याने नंतरच्या तीन-चार वर्षांनी मंदिर पावसाळ्यात गळू लागले. कळसाचे काम किंवा मंदिर गळू नये, यासाठी वॉटर प्रुफिंग करण्यासाठी कारखान्याला परवानगी देत नाही व पुरातत्त्व विभागही करत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसापासून संरक्षणासाठी कारखान्याकडून प्लास्टिक कागद देण्यात येत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
नागरिकांचा कळसासाठी आग्रह
मंदिरावर पूर्वी कळस होता किंवा नाही, याबाबत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाकडून सातत्याने कळसास नकार दिला जात होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी सातत्याने कळस उभारणीच्या कामासाठी आग्रह धरला आहे.
त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी कळस उभारणीसाठी अंदाजपत्रक आणि अहवाल करण्यासाठी नासाडिया वास्तुविशारद संस्थेची नियुक्ती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.