पुणे - राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची मागील दहा वर्षांपासून रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रिया आता लवकरच सुरु करण्याचे संकेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे.
या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांची दोन दिवशीय कार्यशाळा पुण्यात आयोजित करण्यात आली असून, ही कार्यशाळा शुक्रवारी (ता.२८) सुरु झाली आहे.
सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून १८ हजार ९३९ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्चय ग्रामविकास विभागाने केला आहे.
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या. शिवाय या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदांमधील क वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर नव्याने या रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते.
यानुसार सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल डिसेंबर २०२२ लाच राज्य सरकारकडे सादर केला आहे.
या समितीने ११ फेब्रुवारी २०१६ च्या ग्रामविकास विभागाच्या अध्यादेशातील तरतुदींचा अभ्यास करून, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला आहे.
जिल्हा परिषद पातळीवरच भरती होणार
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवरच केली जात असे. राज्य सरकारने मध्यंतरी ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदांचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. परंतु आता पूर्वीप्रमाणे पुन्हा जिल्हा परिषद पातळीवरच ही कर्मचारी भरती केली जाणार आहे.
पुणे झेडपीत ८९९ जागांची भरती
या भरती प्रक्रियेत पुणे जिल्हा परिषदेतील ८९९ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक,
कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी आदी विविध संवर्गातील पदांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
भरतीसाठीच्या परीक्षांच्या विविध अभ्यासक्रम समित्या
- आरोग्य भरती तांत्रिक अभ्यासक्रम समिती
- बांधकाम विभाग भरती समिती
- कनिष्ठ, वरिष्ठ सहायक भरती समिती
- विस्तार अधिकारी भरती समिती
- आरोग्यसेवक भरती समिती
- अभ्यासक्रम तपासणी समिती
समित्यांच्या कार्यशाळेचा आज समारोप
जिल्हा परिषद भरती प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये ग्रामविकास विभागातील उपसचिव, उपआयुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांसह त्या त्या विषयातील एका विषयतज्ज्ञासह सर्व समित्यांमध्ये मिळून ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व अधिकाऱ्यांची दोन दिवशीय कार्यशाळा आज पुण्यात सुरु झाली आहे. या कार्यशाळेचा उद्या (शनिवारी) समारोप होणार आहे. या समित्यांमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,
सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ महादेव घुले आणि रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे आदी अभ्यासू अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.