गोळीबार करणाऱ्या चोरट्यास जीवाची पर्वा न करता पोलिसाने केले जेरबंद

पिस्तुल हातात घेऊन धावणाऱ्यावर झडप घेऊन पोलिस नाईक अंकुश केंगले यांनी चोरट्याला ठेवले जखडून
पोलिस नाईक अंकुश केंगले
पोलिस नाईक अंकुश केंगलेSakal
Updated on

पुणे : गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताची वेळ. सराफी दुकानामध्ये जबरी चोरीचा प्रयत्न करुन, गोळीबार करून पळणारा चोरटा हातात पिस्तुल घेऊन रस्त्याने धावत होता. त्याच्यामागे आरडाओरडा करीत दोघेजण धावत होते. तेवढ्यात गस्तीवर असणारे पोलिस नाईक अंकुश केंगले यांनी पिस्तुलधारी व्यक्तीला त्यांच्या दिशेने येताना पाहीले.

पिस्तुलातील गोळी सुटली तर आपले काय होईल, याचा जरासाही विचार न करता केंगले यांनी कर्तव्याला प्राधान्य देत पिस्तुलधारी चोरट्यावर झडप घालून त्यास दोन्ही हातांनी जखडून ठेवले. अक्षरशः अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग कोणत्याही हिंदी चित्रपटातील नसून कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडला आहे.

पोलिस नाईक अंकुश केंगले
मालकाला नकोशा झालेल्या वडाला सह्याद्री देवराईकडून साताऱ्यात जीवदान

असा रंगला थरार !

मुकेश ताराचंद गुगलीया (वय 50, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. गुगलीया व त्यांचा कामगार शुभम असे दोघेजण गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या दुकानात बसले होते. तेवढ्यात त्यांच्या दुकानात दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यांनी तत्काळ दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर त्यांनी गुगलीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैसे व सोन्याची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे, दागिने देण्यास नकार दिला. त्यामुळे एकाने त्याच्याकडील पिस्तुलामधून गुगलीया यांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यावेळी गुगलीया यांनी गोळी चुकविल्याने ती भिंतीला लागली.

त्यानंतर त्याने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्याकडील पिस्तुल बंद पडले. त्यामुळे गुगलीया व त्यांच्या कामगाराने आरडाओरडा करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, चोरट्याने शटर उघडून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एक चोरटा दुचाकीवरुन पसार झाला. तर दुसरा चोरटा रस्त्यावरुन पळू लागला. त्यावेळी गुगलीया यांच्याकडील कामगार व अन्य नागरीक चोरट्याच्या मागे धावू लागले.

नेमके त्याचवेळी गस्तीवर असणारे कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अंकुश केंगले हे तेथुन जात होते. एक तरुण पिस्तुल हातात घेऊन त्यांच्या दिशेने धावत येताना त्यांना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आणि जीवाची पर्वा न करता, पिस्तुलधारी तरुणाच्या अंगावर झडप घालून त्यास पकडले. त्याच्या हातातील पिस्तुल त्यांनी मोठ्या शिताफीने काढून घेतले. तेवढ्यात गर्दीतील नागरीकांनीही त्यांना त्यांना मदत करुन चोरट्याला पकडले. याबाबतची खबर कोंढवा पोलिस ठाण्यास दिल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीस अटक केली.सौद असिफ सय्यद (वय 24, रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याचा साथीदार पसार झाला.

"व्हिआयपीं'चे सुरक्षारक्ष होते केंगले !

मुळचे भीमाशंकरजवळील जांभोरी गावचे रहिवासी असलेले केंगले हे 2008 मध्ये पुणे पोलिस दलात भरती झाले. त्यांनी वाहतुक शाखेत सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी माजी आमदार उल्हास पवार, खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सुरक्षारक्षक म्हणून सेवा केली आहे. तर मागील साडे तीन वर्षांपासून ते कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

"पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी करण्याच्या प्रकाराबाबत गस्त वाढविण्याच्या सुचना आम्हाला दिल्या होत्या. त्यानुसार गस्तीवर असताना हा प्रकार निदर्शनास आला. आरोपीकडे पिस्तुल असले तरीही क्षणभर जीवापेक्षा कर्तव्य, जबाबदारी मोठी आहे, हे लक्षात घेऊन आरोपीला पकडले. धोका होता, पण दुसरा पर्याय नव्हता.'' अशी भावना केंगले यांनी व्यक्त केली.

"काही दिवसांपासून कोंढवा, वानवडीसह काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेडीकल, हॉटेल व्य्वसायिकांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यादृष्टीने दुकानदारांना सजग केले होते, तसेच नाकाबंदी, गस्तही वाढविली होती. गुरुवारी साडे नऊ वाजता हा प्रकार घडला. त्यावेळी पोलिस नाईक अंकुश केंगले यांनी मोठ्या शिताफीने आरोपीस पकडले. संबंधित आरोपी व त्याच्या साथीदारांकडूनच जबरी चोरीचे प्रकार केले जात आहेत.''

- नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.