पुणे : एखाद्या विषयावर किंवा प्रश्नावर तितक्याच अचुक, खोचक व नर्मविनोदीशैलीत टिपण्णी करणाऱ्या पुणेरी पाट्यांची भुरळ पुणे पोलिसांनाही पडली आहे. कोट्यावधी पुणेकरांना खदखदून हसविणाऱ्या आणि वेळप्रसंगी जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या पुणेरी पाट्यांचा उपयोग करुन पुणे पोलिस 'पुणेरी (पोलिस) पाट्या'द्वारे पुणेकरांना नियम पालनाचा आग्रह करण्याबरोबरच पोलिसांच्या कार्यतत्परतेची जाणीव करुन देणार आहेत.
एखादा नियम पटवून द्यायचा असो नाहीतर, खडेबोल सुनवायचे असो. समोरच्या व्यक्तीला शब्दांमधून वठणीवर आणण्यासाठी पुणेरी पाट्या हमखास ओळखल्या जातात. याच पुणेरी पाट्या आणि पुणेकर हे अजब रसायन गेली कित्येक वर्षांपासून इथल्या मातीमध्ये घट्ट पाय रोवून बसले आहे. आपल्या मार्मिक शब्दातुन एखाद्याला त्या-त्या विषयाचे महत्व पटवून देणाऱ्या पुणेरी पाट्या केवळ थेट, अचुकतेसाठीही तितक्याच प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या नर्मविनोदी शैलीतुन माणसाच्या ह्दयावर राज्य गाजवित त्यास निखळ आनंद देण्याचेही काम या पाट्या करतात. त्यामुळेच पुणे पोलिसांना त्यांचे कार्य समजावून सांगतानाच नागरीकांना नियम पटवून देण्यासाठी पुणेरी पाट्यांचा आधार घ्यावा लागला.
पुणेकरांचा बेरकी स्वभाव ओळखुन पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी याच पुणेरी पाट्यांद्वारे पुणेकरांना पोलिसांचे सध्या सुरू असलेले काम, वेगवेगळ्या योजना, उपक्रम पटवून देण्यासाठी, नागरीकांनी नियमांचे पालन करावे, म्हणून पुणेरी पाट्यांमधून मार्मिकपणे संदेश देण्याचे ठरविले. त्यास भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांनी साथ दिली. अवघ्या काही दिवसातच अनोख्या पद्धतीच्या पुणेरी पोलिस पाट्या तयार झाल्या. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ.वेंकटेशम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी, भारतीय कला प्रसारिणी सभेचे सदस्य काही क्षणांसाठी पुणेरी पाट्यांच्या गंमतीजमतीमध्ये हरवून गेले.
अशा आहेत पुणेरी (पोलिस) पाट्या !
- 'आमच्या येथे महिला कक्ष असला तरी, पुरूषांच्या सांसरिक अडचणी सोडविल्या जातील.'
- 'पुण्यात मुली बिनधास्त फिरतात, कारण त्यांच्या रक्षणासाठी पोलिस काका राबतात.'
- 'गाडी चालविताना मोबाईलवर बोलल्यास, सीडीआर काढून तुमच्या बायकोला दाखविला जाईल.'
- 'लोकांना आपल्यामुळे त्रास झाल्यास, आपल्यालाही कायद्याप्रमाणे त्रास होईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.