पुणे : लातूरमध्ये एका छोट्याशा खेड्यातील गौतम ५ ऑक्टोबरला पुणे पोलिस दलातील रिक्त जागेसाठी होणारी लेखी परीक्षा देण्यासाठी येणार आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी गौतमला प्रवासासाठी मोजकेच पैसे दिले. तेवढे पैसे प्रवास, राहणे व खाण्यापिण्यासाठी कसे पुरवायचे हा गौतमपुढे प्रश्न आहे. परीक्षेसाठी अगोदरच्या दिवशी आल्यानंतर राहायचं कुठं, खायचं काय? हा प्रश्न एकट्या गौतमलाच नाही, तर राज्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो उमेदवारांपुढे पडला आहे. अनेकांनी नेहमीप्रमाणे पदपथावरच रात्र काढायची आणि मिळेल ते अन्न खाऊन परीक्षा द्यायची, अशी मनाची तयारी केली आहे; तर महिला उमेदवार नातेवाइकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी धडपडत असल्याचे वास्तव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रखडलेली पोलिस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. पुणे पोलिस दलामध्ये सव्वा दोनशे जागांसाठी ३९ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार, ५ ऑक्टोबरला पुणे पोलिसांकडून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी त्याची तयारीही केली आहे. या भरतीसाठी नगर, सोलापूर, लातूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उमेदवार पुण्यात येणार आहेत.
बहुतांश उमेदवार हे शेतकरी, मजूर, गरीब व कष्टकऱ्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी प्रवासासाठी कसेबसे पैसे जुळविले आहेत. त्यात अगोदरच्याच दिवशी पुण्यात यावे लागणार असून राहायचं कुठं, खायचं काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे मुलांनी बस, रेल्वे स्थानक, उद्याने, मैदानांच्या आसपास किंवा परीक्षा केंद्रांजवळच्याच परिसरातच पदपथावर रात्र काढायचे ठरविले आहे. मात्र, महिला उमेदवारांना नातेवाइकांच्या घरी आश्रय घेण्याशिवाय पर्याय नसल्याची सद्यःस्थिती आहे.
पुणे पोलिसांची अशीही माणुसकी
पुणे पोलिसांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परप्रांतीय मजूर, नागरिकांना जेवण, नाश्ता व गावी जाण्यासाठी रेल्वे, बसची व्यवस्था केली होती. पोलिसांच्या या नियोजनबद्ध कामगिरीची समाजाने गांभीर्याने दखल घेतली. अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन पोलिसांचा हा आदर्श घेतला होता.
राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एकूण उमेदवारांच्या ६० टक्के उमेदवार हजर असल्याचे समजले आहे. पुणे पोलिस दलाच्या २१४ जागांच्या भरतीसाठी ३९ हजारापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे ६० टक्क्यांपर्यंत उमेदवार येतील असा अंदाज आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठीच सकाळी ११ वाजता परीक्षा घेतली आहे.
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त
माझ्यासारखे हजारो मुले-मुली लेखी परीक्षेसाठी अगोदरच्याच दिवशी पुण्यात येणार आहेत. पैशांची अडचण आहे. त्यामुळे कुठं राहावं, जेवण कुठं करावं, असा प्रश्न पडला आहे.
- कोमल उबाळे,
पोलिस भरती उमेदवार, लातूर
राज्य सरकारने पोलिस भरतीच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी तात्पुरती ‘शिवभोजन थाळी’ केंद्र सुरू करावे. तसेच, महिला उमेदवारांसाठी फिरते शौचालय, अत्यावश्यक सुविधा द्याव्यात.
- ॲड. श्रीकांत ठाकूर,
उच्च न्यायालय, मुंबई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.