पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात 'थर्टी फस्ट'च्या रात्री मद्यपान करुन वाहने चालविणाऱ्या 132 जणांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कारवाईमध्ये घट झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. त्याचबरोबर रात्री अकरा वाजल्यानंतर जमावबंदीचा आदेश देऊन त्यानुसार पोलिसांकडून गुरुवारी रात्री शहरात कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. याबरोबरच पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही थर्टी फस्टच्या रात्री मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर थर्टी फस्टच्या रात्री अकरा वाजल्यानंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर नागरीकांचे प्रमाण कमी होते. दरवर्षी नागरीकांच्या गर्दीने फुलणारे फर्ग्युसन रस्ता, महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगर अशा ठिकाणी तरुणांचे काही मोजके समुहच जल्लोष करताना दिसत होते. तर उर्वरीत नागरीकांनी आपापल्या घरातच नववर्षाचा आनंद साजरा केला.
दरम्यान, रात्री अकरा वाजल्यानंतर रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसत होती. जमावबंदी आदेश असल्याने रात्री अकरानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीला आळा बसला होता. नाकाबंदी वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना वाहन परवाना, विना मास्क चालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यपान करुन वाहने चालविणाऱ्या 132 जणांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी 460 जणांवर कारवाई करण्यात आली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.