बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांना सोमवारी (ता. ३) मंडळात दाखल केला आहे.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला आहे. अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत देखील त्याला समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी (Pune Police) मंडळाला दिली.
पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज सोमवारी (ता. ३) दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत मंडळाचे न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली.
गुन्हा घडल्यानंतर त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्यात विविध प्रकाराचे कट तयार करण्यात आले व त्यातून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तो बाहेर राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होवू शकतो किंवा पुराव्यांत छेडछाड होवू शकते. या सर्व परिस्थिती विचारात घेऊन मुलाचा सुधारगृहातील मुक्काम आणखी १४ दिवस वाढविण्यात यावा, अशी मागणी तांबे यांनी मंडळात केली. या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असून आम्ही मुदतीत अहवाल सादर करणार आहोत. मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची आम्ही पुर्तता करत आहोत, असे त्यांनी न्यायालयास सांगितले.
मंडळातील समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून मुलाचे समुपदेशन करण्यात येत आहेत. त्याचे सत्र अद्याप पूर्ण झालेली नाही. मुलाची आत्ताची परिस्थिती विचारात घेता त्याला आणखी समुपदेशनाची गरज आहे. तसेच त्याला व्यसनाधिनतेपासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे. ज्या कुटुंबाकडे मुलाचा ताबा द्यायचा आहे, त्याची अद्याप चौकशी झालेली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण न होता तसेच एकूण परिस्थितीचा विचार करता त्याला कोणाकडे सोपावले गेले तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे मुलाची सुरक्षा आणि त्याचे पुनर्वसन या दोन्हींचा विचार करून त्याचा बालसुधारगृहाकडे असलेल्या ताब्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद मंडळातील विशेष सहायक सरकारी वकील मोनाली काळे यांनी केला.
मुलाच्या बालसुधारगृहातील मुदतवाढीला त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी विरोध केला. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविण्याबाबतची तरतूद नाही. आत्तापर्यंत तो ताब्यात असताना त्याकडे चौकशी झाली आहे. तसेच सुटका झाल्यानंतर पोलिस बोलवतील तेव्हा चौकशी येणार मुलगा तयार आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्यात येवू नये, असा युक्तिवाद मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी केला.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम १५ नुसार विधी संघर्षित बालकाचे मूल्यांकन करण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व कागदपत्रे एक महिन्याच्या आत पाठविणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल होऊन १६ हून अधिक दिवस झालेले आहेत. त्यामुळे गुन्ह्यात झालेल्या तपासाची कागदपत्रे आणि त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याचे नियोजन केले आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि तपासातून अधिक पुरावे मिळण्याची शक्यता असल्यामुळे मुलाच्या मुदतवाढीबाबच्या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी, अशी विनंती देखील पोलिसांनी केली आहे.
बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांना सोमवारी (ता. ३) मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अग्रवाल राहत असलेल्या परिसरातच रहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहे. मात्र आता त्या कुटुंबाला मुलाचा ताबा मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.