Pune Porsche Accident : नियमांचा पाढा, निवडणूकीचे कारण अन्‌ मद्यप्रेमींचा हिरमोड

सात ते आठ पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. तपासणीचे दिव्य पार पडल्यानंतर आम्ही ‘सीओटू’च्या दारात पोचलो.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentSakal
Updated on

भूगावमधील पबमध्ये जाण्यासाठी रात्री १० वाजता निघालो. गावापासून काही अंतर लांब असलेल्या ‘स्मोकी बीच पब’मध्ये जाण्यास निघालो. पण तिथे पोचल्यावर सर्व अंधार व शुकशुकाट होता. जाताना तिथल्या एका व्यक्तीकडे पब बंद का आहे?, याची विचारणा केली.

तेव्हा चार दिवसांपासून पब बंद असल्याचे त्यांनी सांगितले. तिथे भेटलेल्या आणखी एका जोडीशी गप्पा मारताना हा पब दोन-तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याचे कळले. रात्रीचे ११ वाजले होते. तिथेच ‘सीओटू’ पबची माहिती मिळाल्याने आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो. तिकडे जाण्यापूर्वीच आम्हाला नाकाबंदीला सामोरे जावे लागले.

सात ते आठ पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. तपासणीचे दिव्य पार पडल्यानंतर आम्ही ‘सीओटू’च्या दारात पोचलो. प्रवेशद्वारातच ‘अमली पदार्थ सेवन करण्यास मनाई आहे’, ‘मद्यपान करून वाहन चालवू नये’ असे चकचकीत पोस्टर दिसले. कॅफेत प्रवेश करण्यापूर्वी आमच्याकडे ओळखपत्र मागितले. शिवाय मुलांची तपासणी सुरू होती.

महत्त्वाचे म्हणजे मी ओळखपत्र मोबाईलमध्ये दाखविल्यावर त्यांनी माझा फोन क्षणभरासाठी लपवला. मला माझी जन्मतारीख विचारली. मी ती योग्य सांगितल्यावर मला माझा फोन परत देण्यात आला. आतमध्ये पोचल्यावर तेथील गर्दी पाहून बरे वाटले. गाणी सुरू असली तरीही डान्स करण्यासाठी कोणी तयार नसल्याचे चित्र दिसले.

या कॅफेत रात्री ११ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू होती, त्यापूर्वी पोचलेल्यांच्या टेबलावर मद्य दिसले, पण त्यानंतर आलेल्यांना मद्याचा आस्वाद मिळाला नसल्याने इथेही मद्यप्रेमींचा हिरमोड झाल्याचे दिसले. अनेक मुलं-मुली धूम्रपान करताना दिसले. वेटरशी गप्पा मारल्या, तेव्हा आपले वय पाहता, ते मद्य देतील का?, याची चाचपणी मला करायची होती.

शेवटी ‘अल्कोहोल द्याल का?’, अशी विचारणा केली तेव्हा, पुन्हा निवडणूक व कल्याणीनगर अपघाताची माहिती देण्यात आली. नियमांचा पाढा वाचण्यात आला. सुरुवातीला हे कॅफे मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू असायचे. साडेअकरा वाजता इथले दिवे विझविण्यात आले, मात्र आतमध्ये जेवण, मद्यपान, गप्पांच्या मैफली रंगतच होत्या. पुढे १२ वाजता आम्ही ‘टर्टल’ला गेलो. तिथेही मद्यपान बंद असल्याचे कळले. तिथे कोणीही ओळखपत्र मागितले नाही.

वैयक्तीक माहिती, फोन नंबर नोंदवून घेतला. डान्स फ्लोअर सुरु असला तरी आवाजही कमी होता. तिथे पुन्हा मद्याची मागणी केली. तेव्हा, मद्य मिळणार नाही, असे सांगण्यात आले. दीड वाजता तिथून बाहेर पडलो.

कुठे नियमांचे पालन, तर कुठे ‘ठेका’ कायम !

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील ‘रिओ’ पबमध्ये रात्री पावणेदहा वाजता पोचलो. सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावरच ‘फक्त ड्रिंक’ असे सांगत प्रवेश दिला. मात्र पबच्या दारातच कर्मचारी व बाउन्सरने मार्ग अडवून पब बंद झाल्याचे कारण सांगितले. एवढ्या लवकर बंद करण्याचे कारण काय? असा प्रश्‍न विचारल्यानंतर कल्याणीनगर अपघाताची घटना आणि त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून वाढलेल्या निर्बंधाची जंत्रीच त्यांनी वाचायला सुरुवात केली.

नियमांची पाटी, सीसीटीव्ही तेथे लावल्याचे दिसले. जादा पैसे घेऊन आत जाण्याचा विचार बोलून दाखविल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी नकार दिला. इथला डिजे १० वाजताच बंद झाला होता. एरवी पहाटे चारपर्यंत सुरू राहणारा हा पब आता मात्र साडेदहा वाजताच बंद होत असल्याचे वास्तव होते.

अखेर दुसऱ्या पबकडे वळलो. ११ वाजता ‘एफएमएल, फूड, म्युझिक अँड लव्ह’ नावाच्या पबमध्ये पोचलो. प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांनी वयाचा पुरावा, आधार कार्डची मागणी केली, त्यानंतर प्रवेश दिला. आत प्रवेश करताच रंगीबेरंगी लाइटिंगने सजलेला पब पाहायला मिळाला. सर्वत्र गोंगाट होता. जेवणाचे सर्व टेबल फुल्ल होते.

अनेकजण वेटिंगला होतो. इथे तरुणाई मद्यपान करून सिगारेटचे झुरके मारत डिजेच्या तालावर बेधुंद नाचण्यात दंग होती. कोल्ड्रिंक व जेवण टेबलावरच देण्याचा इथला शिरस्ता आहे. तुरळक गर्दी आणि काही टेबल रिकामे दिसल्याने पबच्या वरच्या मजल्यावर गेलो.

ऑर्डर घेणे बंद झाल्याने कोल्ड्रिंक मिळणार नसल्याचे सांगणाऱ्या कर्मचाऱ्याने शंभरच्या नोटेचे आमिष दाखवताच जेवण, कोल्ड्रिंक तत्काळ जागेवर पोचविले. घड्याळाने बाराचा काटा ओलांडताच कर्मचाऱ्यांकडून पब बंद करण्याच्या सूचना येऊ लागल्या.

बाहेरून बंद अन् आतून सुरू

बाणेरमधील ‘एजंट जॅक्‍स’ या बारमध्ये रात्री ११ वाजता आम्ही धडकलो. गर्दी तुलनेने कमी होती. प्रवेशद्वारातच कर्मचाऱ्याने वयाच्या पुराव्याची तपासणी करून किती जण आहात?, मद्य घेणार आहात का? अशी बारीकसारीक माहिती त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद करून घेतल्यानंतरच पुढचा मार्ग मोकळा केला. आतमध्ये प्रवेश करताच ‘२५ वर्षांखालील व्यक्तींना तसेच मद्य सेवन परवान्याशिवाय मद्य विक्री केली जात नाही’, या ठसठशीत मराठी फलकाने आमचे स्वागत झाले.

आतमध्ये बसल्यानंतर सगळीकडे नजर गेली. तेव्हा, तिथे बरेच जण आपल्या लहान मुले, कुटुंबासोबत, मित्र मैत्रीणींसोबत तर काही प्रेमी युगुलही ओपन स्पेसमध्ये बसल्याचे दिसले. जेवणाव्यतिरीक्त टेबलावर मद्य, शीतपेये काही दिसली नाहीत. वेटरकडे चौकशी केल्यानंतर त्याने बार १२ वाजता बंद होतो, असे सांगितले.

बहुतांशजण जेवणात व्यग्र होते. तिथे मद्य दिले जात नव्हते. मग ठरविल्याप्रमाणे आम्ही बारकडे वळालो. तिथे पुन्हा एकदा आयडीची विचारणा झाली. तपासणीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी कल्याणीनगरच्या घटनेचा पाढा वाचला. ‘‘आधी काही २१ ते २२ पर्यंतच्या तरुणांना मद्य दिले होते, पण आता वय पाहूनच ‘हार्ड ड्रिंक्‍स’ दिली जाते’ असेही त्याने आवर्जून सांगितले.

गर्दी असल्याने एकही टेबल रिकामा नव्हता. काही वेळाने एक टेबल आम्हाला मिळाला. गर्दीमध्ये तरुणांची संख्या मोठी होती. ॲपद्वारे जेवणाची ऑर्डर दिली, त्यामध्ये वयाचा उल्लेख चुकीचा करूनही ॲप खुले झाले. आतमध्ये डिजेचा आवाज असला तरी, गोंधळ मात्र नव्हता. ठिक साडेबारा वाजता डिजे बंद झाला. त्यानंतर शेवटच्या ऑर्डरची घोषणा आणि तत्काळ बिल करण्यास सुरूवातही झाली.

हायस्ट्रीट परिसरात एकला सामसूम

बारमध्ये पावणेबारा वाजता प्रवेश बंद झाला, त्यानंतर ओपन स्पेस रिकामा करण्यात आला. बाहेरून पाहणाऱ्याला बार बंद झाल्याचे भासत असले, तरी आतमध्ये मात्र सर्वकाही सुरळीत सुरू होते. १२.३० वाजता ऑर्डर घेणे बंद झाले. त्यानंतर बाऊन्सरने बार बंद होत असल्याचे सांगून आवराआवर करण्याच्या सूचना दिल्या.

पावणेएक वाजता बार रिकामा झाला आणि आम्ही निघालो. बाहेर पडल्यानंतर हायस्ट्रीट परिसरातील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई सुरु होती. रस्त्यावरील गर्दी आता ओसरली होती. एरवी गजबजलेले बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात एक वाजता सामसूम पसरलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.