पुणे : कल्याणीनगर भागात भरधाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. शिवाय मुलगा अल्पवयीन असूनही वडिलांनी त्याला मोटार चालविण्यास दिली; या कारणावरून पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयित अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, ‘कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे आणि बार काउंटर जयेश सतीश बोनकर या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मेच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लॅंडमार्क सोसायटीजवळ भरधाव ग्रे रंगाच्या आलिशान पोर्श गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात अनिष अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध (वय १७ वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन आरोपी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यानिमित्त पार्टी करण्यासाठी तो १८ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दहा-बारा मित्रांसमवेत मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील कोझी हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. त्यांनी मद्य आणि खाद्यपदार्थ ऑर्डर केले. कोझी हॉटेलचे मालक नमन भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर यांनी अल्पवयीन आरोपी मुलासह त्याच्या मित्रांना मद्य सर्व्ह केले. त्यानंतर ते मध्यरात्री बारा वाजता मुंढव्यातील हॉटेल ब्लॅकमध्ये मद्य पिण्यासाठी गेले. हॉटेलचे ब्लॅकचे मालक संदीप सांगळे आणि बार काउंटर जयेश बोनकर यांनीही ते मध्यरात्री बारा वाजता हॉटेलमध्ये आल्याचे सांगितले. परंतु अल्पवयीन असूनही खात्री न करता त्यांना मद्य पुरवले, या कारणावरून पोलिसांनी दोन्ही हॉटेल मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, अल्पवयीन आरोपीने मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. त्याच्याकडे वाहन परवानाही नाही. असे असताना वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिली. हे कृत्य बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ७५, ७७ प्रमाणे आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) नुसार गुन्हा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
- अल्पवयीन आरोपीने मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही
- आरोपी मुलाकडे मोटार वाहन परवाना नाही
- जीवितास धोका होऊ शकतो हे माहीत असताना, वडिलांनी मुलाला मोटार चालविण्यास दिली
- हॉटेलमालक, व्यवस्थापकांनी मद्य पुरविण्यापूर्वी मुले अल्पवयीन असल्याची खात्री केली नाही
- दोन्ही हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य सर्व्ह करण्यात आले
१८ मे रात्री ९.३० वाजता : अल्पवयीन आरोपी मित्रांसमवेत मुंढव्यातील कोझी हॉटेलमध्ये.
१८ मे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत : कोझी हॉटेलमध्ये पार्टी
१९ मे रोजी मध्यरात्री १२ वा.नंतर : हॉटेल ब्लॅकमध्ये गेले
१९ मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत : हॉटेल ब्लॅकमध्ये पार्टी
१९ मे पहाटे २.३० वा. : भरधाव आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीस्वार आणि इतर दोन वाहनांना धडक दिली.
१९ मे सकाळी ८.१३ वा. : येरवडा पोलिसांकडून अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल.
१९ मे दुपारी चारच्या सुमारास : आरोपीला अटी शर्तींवर जामीन
२० मे १२.४८ वा. : मुलाच्या वडिलाविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल.
तसेच हॉटेल मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ७७ नुसार गुन्हा दाखल.
कल्याणीनगरमधील या अपघातात दोन निष्पाप तरुण-तरुणीचा बळी गेला. तरीही पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर केले. सुटीच्या दिवशी न्यायालयात हजर करण्याची पोलिसांनी इतकी तत्परता कोणामुळे दाखवली, असा प्रश्न विचारत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.