Pune News: कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलिस योग्य प्रकारे कारवाई करत आहेत. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात शनिवारी सकाळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. पवार म्हणाले, विरोधक काय आरोप करीत आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून चौकशीत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे.
अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री म्हणून मी चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली या प्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमं लावण्यात आली. चौकशीत दोन पोलिस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी सुरु आहे. अपघात घडला तेव्हा मंत्री हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही आपल्या खात्याला सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे.
अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी कोणावरही दबाव आणला नाही. मतदारसंघात एखादी घटना घडल्यास आमदार त्या ठिकाणी जातात, असे सांगत अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.