पुणे - शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने, झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. विशेषतः विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, बिबवेवाडी, बाणेर बालेवाडी येथील रस्त्यांवर पावसामुळे वाहतुक मंदावली. एक तासाहून अधिक काळ वाहतुक कोंडी झाल्याने नागरीक अक्षरशः त्रस्त झाले.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये सायंकाळी पाऊस येत आहे. सायंकाळी नागरीक घरी परतण्याच्या मार्गावर असतानाच पावसाचे आगमन होत असल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत असल्याची सद्यस्थिती आहे.
त्यानुसार, शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनांची गती मंदावली. विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, जंगली महमाराज रस्ता, कात्रज, वारजे माळवाडी, बाणेर, बालेवाडी, बिबवेवाडी, सातारा रस्ता, उंड्री, पिसोळी, फुरसुंगी या परिसरामध्ये पाऊस झाला. पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तुंबल्याने वाहनांची गती मंदावली.
त्यामुळे काही ठिकाणी वाहतुक कोंडी झाली, तर काही ठिकाणी वाहतुक संथ गतीने सुरु होती. बिबवेवाडी येथे रस्त्यांवर पाणी साठले, तसेच चेंबरची झाकणे उचकटून पावसाचे पाणी बाहेर आल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून रस्त्यांवर पडली. त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाण्यास अडथळा आला.
अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा नागरीकांना वाहतुक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. सेनापती बापट रस्ता परिसरातही पावसामुळे वाहतुक खोळंबली.
त्याचबरोबर बालभारती - पौड फाटा रस्त्याला विरोध दर्शविण्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या शांतता रॅलीमध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे देखील सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुक कोंडीमध्ये भर पडली.
"सेनापती बापट रस्त्यावरुन सायंकाळी साडे पाच वाजता चतुःशृंगीहून कोथरुडला निघालो होतो. जे.डब्ल्यू मॅरीएट हॉटेलजवळील चौकात आल्यानंतर वाहतुक कोंडी सुरु झाली. सुमारे तासभर वाहतुक कोंडीत अडकून पडलो. पर्यायी मार्गही वाहनांच्या गर्दीने भरले होते.'' किसन कोऱ्हाळकर, नोकरदार
शहरात झाडपडीच्या 12 घटना
शहरात सायंकाळी पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. बिबवेवाडी, एरंडवणे, महात्मा फुले पेठ, तळजाई, कोंढवा, विधी महाविद्यालय रस्ता,लुल्लानगर, धनकवडी, कात्रज माणिकबाग या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), एसएनडीटी या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यांवर पडलेली झाडे कापून बाजुला करीत वाहतुकीला रस्ता मोकळा करुन दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.