Pune Rain update - दोन आठवड्यांपासून डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनमुळे शहरात पावसाला सुरवात झाली खरी, पण अजूनही पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दिवसभर ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, असे चित्र सध्या आहे. नाही म्हटलं तरी यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
गुरुवारी (ता.६) सकाळपासून ढगाळ असलेले आकाश दुपारी मात्र निवळले होते. संध्याकाळी पुन्हा एकदा ढगाळ हवामान आणि अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. संध्याकाळ पर्यंत शहरात सरासरी एक मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवसात राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरात आकाश मुख्यतःढगाळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही कोकणासह, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस..
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, मंडला, अंबिकापूर, बालासोर ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र टिकून आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रात दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.