पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात पावसाचे संकट वारंवार उद्भवत आहे. सतत कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात असताना शनिवारी मराठवाडा, नाशिक जिल्ह्यांत पावसामुळे उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरले आहे.
मराठवाड्यात काही भागात शुक्रवारी (ता. ८) रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर आज दुपारी विविध भागांत वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि एक महिला गंभीर जखमी झाली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, येवला व चांदवड तालुक्याला कालपासून पावसाने झोडपून काढले. चांदवडमध्ये एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील गव्हाण (ता. रेणापूर) शिवारात आज विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वीज पडून उज्ज्वला नागनाथ खपराळे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील मिसळवाडी (ता. पाटोदा) येथील शिवराज गोविंद चव्हाण (वय १७) याचा वीज पडून मृत्यू झाला.
तिसऱ्या व चौथ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव व अष्टूर येथे वीज पडून बालाजी बापूराव पवार (वय ४०) आणि महिपती दत्ता म्हेत्रे (वय १९) यांचा मृत्यू झाला. पाचव्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील कोसमेट येथे सुशांत गजानन कामीलवाड (वय ११) याचा वीज पडून मृत्यू झाला. तेर (ता. उस्मानाबाद) येथील तेरणा नदीच्या पुराचा अंदाज न आल्याने काल रात्री प्रशांत अण्णा मदने (वय १८) हा तरुण दुचाकीसह पुलावरून वाहून गेला. बीड जिल्ह्यातील पाच जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला.
मराठवाड्यात शनिवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ७.८ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील दोन, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. शनिवारी सकाळपर्यंत उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यात गेवराई, अंबाजोगाई, पाटोदा, वडवणी आणि परळी तालुक्यातील काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाई तालुक्यात नद्यांना पूर आला.
ढगफुटीसदृश्य पाऊस
दिंडोरी तालुक्यात आजही दुपारी साडेतीन ते चार या वेळेत ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला. सध्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने बुरशीनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असल्याने बागेत गाळ निर्माण झाला आहे.
येवला तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पावसाने आज अक्षरशः झोडपून काढले. दुपारी दोनला मेघगर्जनेसह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तासाभरात नद्या, नाले, ओढ्यांसह शेतातून पाणी वाहिले. साताळी (ता.येवला) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने सर्वांची वाताहात केली. नदीला पूर आल्याने शेतीमध्ये अडकलेल्या मजुरांना ग्रामपंचायत सदस्यंच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. दिंडोरी तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.