पुणे - चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्यात येणार असल्याने या नोटेच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेल भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत अधिक गुलाबी नोट दिसत आहे. काही पंप कोणतेही आढे-वेढे न घेता या नोटा स्वीकारत आहेत तर काही वाहन चालकांना या नोटा घेतल्या जात नसल्याचा अनुभव आला आहे.
दोन हजार रुपयांची नोट बदली करण्यासाठी बँकेत जावे लागू नये. जास्त प्रमाणात या नोटा असतील तर त्या बदलण्यासाठी ऐन वेळी पळापळ नको, या व अशा अनेक कारणांतून सध्या दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून खरेदी केली जात आहे. पेट्रोल पंपावर देखील मोठ्या प्रमाणात या नोटांचा वापर वाढला आहे.
या नोटा बदली करण्यासाठी पुरेशी मुदत असल्याने त्या स्वीकारून इंधन भरले जात आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट स्वीकारल्यानंतर वाहन चालकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असल्याची परिस्थिती काही पंपावर आहे. तर काही ठिकाणी सरळ या नोटा नाकारल्या जात आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पंपावरील कर्मचारी यांच्यात किरकोळ वाद झाल्याचे प्रकार देखील घडत आहेत.
नोट दोन हजारांची पेट्रोल शंभर रुपयांचे -
केवळ दोन हजार रुपयांची नोट बदलून घ्यायची आहे म्हणून गाडीत १००-२०० रुपयांचे पेट्रोल टाकू, असे वाहनचालक देखील पंपावर वाढले आहेत. अनेकांनी या माध्यमातून नोटा बदली करून घेतल्याचे पंपावरील कर्मचारी सांगतात. मात्र जर कोणी दोन हजार रुपयांची नोट देवून केवळ १०० ते ५०० रुपयांचे इंधन भरून घेत असेल तर त्याला जास्त रकमेचे इंधन घेण्याची विनंती पंपावरील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा पेट्रोल-डिझेल मिळणार असल्याचे स्पष्ट केले जात आहे. या सर्वांत सुटे पैसे देण्यासाठी पंपचालकांना कसरत करावी लागतेय.
दोन हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारून ग्राहकांची गैरसोय करू नये. नोट स्वीकारली नाही म्हणून पंपचालकांवर काही कारवार्इ झाल्यास संघटना त्यांच्या मागे उभी राहणार नाही, याची कृपया पंपचालकांनी नोंद घ्यावी. तसेच संघटनेकडून सर्व सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
पूर्वी दिवसातून दोन हजार रुपयांच्या केवळ चार ते पाच नोटा जमा होत. आता हा आकडा १५० च्या वर गेला आहे. ग्राहकांकडून या नोटा आम्ही नाकारत नाहीत. मात्र कमी रकमेचे इंधन भरल्यानंतर सुटे पैसे देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सुटे पैसे मिळण्यासाठी वाहनचालकांनी थोडा धीर धरणे आवश्यक आहे.
- योगेश देशपांडे, संचालक, कुलकर्णी पेट्रोल पंप
पेट्रोल भरण्याआधीच मला रोख की ऑनलार्इन पेमेंट करणार? रोखीसाठी दोन हजार रुपयांची नोट आहे का? असे सवाल करण्यात आले. दोन हजार रुपयांची नोट घेवू मात्र जास्त रकमेचे पेट्रोल भरा, असा विनंती करण्यात आली होती. मी एक हजार रुपयांचे इंधन भरल्यानंतर नोट घेण्यात आली.
- सोमनाथ कुंभार, वाहनधारक नोकरदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.