Shaniwar Wada History : शनिवार वाडा म्हणजे पुणेकरांचा अभिमान. फक्त भारतातच नाही तर जगभरात कित्येकजण पुणे म्हटलं की शनिवार वाड्याचं नाव घेतात. छत्रपतींचे प्रधान असणाऱ्या पेशव्यांचा हा राजवाडा. या ऐतिहासिक वास्तुला 291 वर्षे पूर्ण झाली. चला तर या वास्तुचा इतिहास जाणून घेऊ. (Pune : Shaniwar Wada History 291 years completed read story)
शंभू पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बाळाजी विश्वनाथ भट यांचे चिरंजीव पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याची उभारणी केली. अस म्हणतात की पुण्यात एकदा शिकारीसाठी आलेल्या बाजीराव पेशव्यांना दृष्टान्त झाला आणि तेव्हा त्यांनी मुळा मुठेच्या काठावर वाडा उभारण्याचे नक्की केले.
माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याचे नाव शनिवार वाडा असं ठेवण्यात आले.
पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांती झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. वाडा उभारण्यासाठी त्याकाळात १६,११० रुपये इतका खर्च हा वाडा बांधण्याकरीता आला.
हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे..
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत.
येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत.
सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यात दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो.
या महालात एकाच वेळी 1000 लोक राहु शकत होते, अश्या प्रकारची सोय या वाडयात करण्यात आली होती.
27 फेब्रुवारी 1828 ला या वाडयाला आग लागली आणि ती आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गुढ आणि रहस्य बनुन राहीले आहे. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.