सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने काही तासातच हरवलेल्या सतरा वर्षाच्या गतिमंद मुलाचा शोध लागल्याने आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.
बालेवाडी - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने काही तासातच हरवलेल्या सतरा वर्षाच्या गतिमंद मुलाचा शोध लागल्याने आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.
शुक्रवार, ता. 19 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने रास्ता पेठ येथील आयुष (नाव बदलले आहे) हा सतरा वर्ष आठ महिन्यांचा गतिमंद मुलगा आपल्या बहीण व आई बरोबर रास्ता पेठ येथील शाहू उद्यानाजवळून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जात असताना गर्दीत चुकला. हा मुलगा गतीमंद असून त्याला जास्त बोलता येत नसल्यामुळे मुलगा हरवल्याचे लक्षात येताच आईच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आयुषला दोन मोठ्या बहिणी असून वडील रिक्षा चालवतात, तर आई अंगणवाडीत काम करते. गणपती विसर्जनामुळे रस्त्यावर खूपच गर्दी होती, एवढ्या माणसांच्या मुलाला शोधणे अशक्य होते. रात्रभर मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून रास्ता पेठेतील पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे (ता. 10 वार शनिवार) रोजी हा मुलगा पाषाण येथील पोलीस चौकी जवळ बसलेला बाणेर येथील रहिवाशी रूपा साळवी यांना दिसला. त्यांच्या हा मुलगा गतिमंद असल्याचे लक्षात येताच त्याची जवळ जाऊन विचारपूस केली. पण त्याला फक्त त्याचे पहिले नाव सांगता येत होते व मुंबई एवढेच सांगता येत होते. यावरून काहीच अंदाज लावता न आल्याने त्यांनी पाषाण चौकीत जाऊन या संदर्भात माहिती दिली. यावेळी तेथील पोलीस नाईक भाऊराव वारे, दत्तात्रेय गनजे, अनिल वनवे यांनीही मुलाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्याचा फोटो काढून आसपासच्या परिसरामध्ये दाखवला. या मुलाला कोणी ओळखते का याची चौकशी केली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या अनेक ग्रुप वर पोस्ट टाकण्यात आली. रूपा साळवी यांनी पूला या महिलांच्या ग्रुप वर ही पोस्ट टाकली होती. ती पाहून एका मुलीने यांना फोन करून हा मुलगा तिचा भाऊ असल्याचे सांगितले. व तो रास्ता पेठ येथील रहिवासी असल्याचेही सांगितले. पाषाण पोलीस चौकीतून त्वरित रास्ता पेठ पोलिसांना संपर्क साधून या बाबतीत शहानिशा करण्यात आली. रास्ता पेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांना माहिती देण्यात आली.
रास्ता पेठ पोलिस या मुलाचा शोध घेत होते. ता. दहा रोजी सकाळीच कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. रास्ता पेठ पोलिसांकडून आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू होते. पण पाषाण पोलीस चौकीतून फोन आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. रास्ता पेठ पोलिसांकडून मुलाची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. व नंतर मुलगा आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आला अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रास्ता पेठ मीरा त्र्यंबके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.