पावसाळा आला की धाकधूक वाढायची... फ्लॅटमध्ये छतातून पाणी झिरपायचे... ड्रेनेज लाईनमध्येही सतत अडचणी, लिफ्ट नव्हती... अशा एक ना अनेक अडचणी होत्या.
पुणे - पावसाळा आला की धाकधूक वाढायची... फ्लॅटमध्ये छतातून पाणी झिरपायचे... ड्रेनेज लाईनमध्येही सतत अडचणी, लिफ्ट नव्हती... अशा एक ना अनेक अडचणी होत्या. आज मात्र या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्याच ठिकाणी सर्व सोयीसुविधांयुक्त वन बीएचकेचा टू बीएचके फ्लॅट मिळाला... टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीतील वैष्णवी कृपा सहकारी सोसायटीतील तारकेश्वरी देशमुख सांगत होत्या.
वैष्णवी कृपा सहकारी सोसायटी ४० वर्षे जुनी होती. नऊ सदनिकांच्या सोसायटीत बऱ्याच समस्या होत्या. त्यामुळे सदस्यांनी एकत्र येत पुनर्विकासाचा निर्णय घेतला. आज त्या ठिकाणी १५ सदनिकांची सोसायटी बांधून पूर्ण झाली आहे. प्रत्येक सदनिकाधारकाला ताब्यात असलेल्या जागेच्या ३० टक्के जागा अधिक मिळाली आहे. योग्य बांधकाम व्यावसायिकाची निवड आणि सोसायटीच्या सदस्यांनी एकत्रित घेतलेल्या निर्णयामुळेच हे शक्य झाले. आमच्या सोसायटीचे पालटलेले रूपडे बघून आजूबाजूच्या सोसायट्यांनी एकत्र येत पुनर्विकासाचा विचार सुरू केला आहे. काही सोसायट्यांचे काम देखील सुरू झाल्याचे देशमुख सांगत होत्या.
एकीकडे हे चित्र आहे, तर दुसरीकडे कर्वेनगरमध्ये झेलम सोसायटीने बांधकाम व्यावसायिकांची पुरेशी माहिती न घेता त्यांनी दाखविलेल्या मोठ्या आमिषाला बळी पडून सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम दिले. १० वर्षांनंतर बांधकाम पूर्ण झाले. ज्या सुविधा (ॲमेनिटी) देण्याचे आश्वासन दिले होते, त्याही पूर्ण दिलेल्या नाहीत. भाडेदेखील बांधकाम व्यावसायिकाने नियमित दिले नाही. बांधकामही निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला आहे. आता बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध लढाई सुरू असल्याचे सुनिला शेंडे यांनी सांगितले. त्यामुळे सोसायटीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मतही सोसायटीधारकांनी व्यक्त केले.
पुनर्विकासाच्या निर्णयापूर्वी....
सोसायटीचा कन्व्हेयन्स झाला आहे का?
प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव लागले आहे का?
आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत का?
सोसायटी ३० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे का?
सोसायटीसमोरील रस्ता किती मीटर रुंदीचा आहे?
पुनर्विकास करावयाचा झाल्यास किती एफएसआय मिळू शकतो?
त्यासाठी योग्य वास्तूविशारदाची नेमणूक केली आहे का?
विकसकाची निवड कशी करावी?
विश्वासार्हता गरजेची, बांधकामाची गुणवत्ता
आर्थिक क्षमता
विकसकाने दिलेल्या प्रस्तावाची तज्ज्ञांकडून तपासणी
अवास्तव ॲमेनिटी आणि वाढीव क्षेत्रफळाचा प्रस्ताव दिल्यास
वस्तुस्थिती तपासणे
विकसक आणि सोसायटी या दोघांच्या फायद्याचा ताळमेळ कसा बसेल, याचा विचार करावा
पुनर्विकासाचे फायदे काय?
जुन्या वास्तूच्या जागी नवीन वास्तू
वाढीव किंवा जास्तीची जागा विना मोबदला अथवा कमी किमतीत
आधुनिक सोईसुविधा मिळतात (उदा. लिफ्ट, पॉवर बॅकॲप,
सोलर वॉटर, पार्किंग)
वास्तूची बाजारातील किंमत वाढते
नव्याने मालकी हक्काचे सर्व कागदपत्रे तयार होतात
पुनर्विकासाचे तोटे काय?
पूर्वीपेक्षा मेंटेनन्स वाढतो
मिळकतकरात (प्रॉपर्टी टॅक्स) मोठी वाढ होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.