Pune : पुणे सोलापूर महामार्गावर आजही परिस्थिती जैसे थे

महामार्गावर तळे वाहनांच्या रांगा आणि कसरत
pune
pune sakal
Updated on

मांजरी : परवा रात्री व काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरी परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर लक्ष्मीकॉलनी ते स्टडफार्म या अंतरात मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. दोन दिवस होऊनही पालिका प्रशासनाला या पाण्याचा निचरा करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आजही येथील परिस्थिती जैसे थे असून वाहतूककोंडी सुटलेली नाही.

महामार्गावर या ठिकाणी सखल भाग असल्याने दोन्हीही बाजूला मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. महामार्गावरील या परिस्थितीमुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार यांना वेळेत पोहचता आले नाही. कवडीपाट टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. ऐन सनासुदीच्या खरेदीच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाल्याने व्यवसायीक व महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याच परिसरात विभागीय बाजार समितीजवळही बाजारासाठी आलेल्या वाहनांमुळे गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याचाही मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. महामार्गावरील व्यवसायिकांच्या शेडमध्ये शिरलेले पाणीही अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे तेथे राहणाऱ्या कुटुंबांची परवड झाली आहे.

"या परिसरातील काही नैसर्गिक ओढेनाले बंद झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. याला बांधकाम व्यवसायीक व प्रशासन मोठ्याप्रमाणात जबाबदार आहेत. पाण्याचा निचरा होणारी यंत्रणाही येथे अपुरी व कुचकामी आहे. पालिका प्रशासनाने येथील ओढेनाले खुले करून घ्यावेत तसेच पावसाळी वाहिन्यांची क्षमता वाढवावी,' अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी उपसरपंच राहुल घुले यांनी केली आहे.

दरम्यान वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुण्याकडून जाणाऱ्या वाहतूक मार्गावरील चेंबर तोडून पाणी काढून दिले आहे. मात्र, शहरात येणाऱ्या मार्गावरील पाण्याचा निचरा अद्यापही होऊ शकला नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रणात अडचण येत असल्याचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महादेव देसाई यांनी सांगितले.

"येथे सखल भाग असल्याने व शेजारील जमिनीतील पाण्याची पातळी वाढून रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळी वाहिनी जेसीबी यंत्राच्या साह्याने तोडून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही पाणीपातळी कायम आहे. जुन्या ड्रेनेजमधून पाणी वळविण्यासाठी यंत्रसामुग्री पाण्यामुळे पोहचत नाही. आता काही ठिकाणी पंप लावून उपसा केला जाणार आहे.'

प्रसाद काटकर सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.