Pune : स्टार्टअप संकल्पना सादरीकरणात पंचविशीतील किशोर उबाळे अव्वल

भीतींवरील टचस्क्रीनची निर्मिती : जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर
pune startup presentation
pune startup presentation
Updated on

पुणे : राज्यस्तरीय स्टार्टअप व नावीन्यता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय स्टार्टअप संकल्पनांच्या सादरीकरणात पुण्यातील प्रभात रोड येथील पंचविशीतील किशोर उबाळे यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी अगदी माफक दरात उपलब्ध होणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारच्या भिंतींवर लावता येईल अशा प्रोजेक्टरच्या टचस्क्रिनची निर्मिती केली आहे.

पुणे शहरातील करिष्मा शहा यांनी द्वितीय तर, अनिरुद्ध गुंजाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. करिष्मा शहा यांनी कागद उत्पादन कंपन्यांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर करून हरित ऊर्जेची निर्मिती करणारा स्टार्टअप प्रकल्प उभारला आहे. गुंजाळ यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विजेवर चालणाऱ्या एक आसन क्षमतेची केवळ १४ किलो वजनाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मितीची संकल्पना सादर केली. या स्कूटरचा वापर हा शैक्षणिक संस्था किंवा मोठ्या कंपन्यांच्या परिसरात फिरण्यासाठी आणि प्रदूषण कमी होण्यासाठी करता येणार आहे.

पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन विभागात शुक्रवारी (ता.१४) दिवसभर या जिल्हास्तरीय स्टार्टअप संकल्पना सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा पहिला टप्पा पुणे जिल्ह्यात १७ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यात या यात्रेमधील तालुकास्तरीय प्रचार व प्रसिद्धी अभियानाचा पहिला टप्पा झाला होता.

आज दुसऱ्या टप्प्यामध्ये संकल्पनांचे जिल्हास्तरीय सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या सन २०१८ च्या नावीन्यतापूर्ण स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ही राज्यस्तरीय स्टार्टअप व नावीन्यता यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार आणि जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सा. बा. मोहिते उपस्थित होते.

विजेते हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

या जिल्हास्तरीय स्पर्धेत गुणानुक्रमे पहिल्या तीन युवकांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील हे तीनही विजेते आता राज्यस्तरीय स्टार्टअप संकल्पना सादरीकरणासाठी पात्र ठरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.