Pune : साखर कारखान्यांसमोर यंदाही ऊस गाळपाचे आव्हान

राज्यात उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच आहे.
pune
punesakal
Updated on

पुणे : राज्यात यंदा येत्या १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांसह आयुक्तालय स्तरावर तयारी सुरू आहे. राज्यात उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच आहे. गेल्या हंगामात संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्यांसह साखर आयुक्त कार्यालयाची दमछाक झाली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातही संपूर्ण उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.

राज्यात गतवर्षी उसाचे क्षेत्र १४ लाख ८८ हजार हेक्टर इतके होते. राज्यात यावर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस असून, सोलापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर, नगर जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्टर, पुणे जिल्ह्यात एक लाख ५७ हजार हेक्टर, सांगली जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात एक लाख १६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. यावर्षी सिंधुदुर्ग, गोंदिया, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, रत्नागिरी, चंद्रपूर आणि ठाणे जिल्ह्यातही उसाचे उत्पादन घेण्यात आले आहे. यंदा उसाची सरासरी उत्पादकता ९५ टन प्रति हेक्टर अपेक्षित आहे.

मागील हंगामात दोनशे कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. कारखान्यांनी सुमारे १३२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. मागील हंगामात राज्यात १३५ लाख ३६ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते.

यावर्षीच्या हंगामात २०३ कारखाने सुरु होतील, असा अंदाज आहे. साखरेचा उतारा ११.२० टक्के ग्राह्य धरल्यास दीडशे लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. परंतु इथेनॉल निर्मितीसाठी १२ लाख मेट्रिक टन साखरेचा वापर होणार आहे. त्यानुसार १३८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

‘या’ कारखान्यांना गाळप परवाना नाही

राज्यातील ११९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या बिलापोटी संपूर्ण एफआरपी (रास्त आणि किफायतशीर) दिली आहे. ७५ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपी दिली आहे. तर, एफआरपी थकविणाऱ्या सात कारखान्यांच्या विरोधात महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) कारवाई केली आहे. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना यावर्षी गाळप परवाना देण्यात येणार नाही, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.