Pune : फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी : दिलीप वळसे पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, फुले- शाहू -आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
Pune
Pune Sakal
Updated on

तळेगाव ढमढेरे : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, फुले- शाहू -आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार देशाला तारू शकतील, पुरोगामी महाराष्ट्रात सर्व समाजसुधारकांची विचारधारा एकसारखीच होती. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणे काळाची गरज निर्माण झाली आहे असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १३२ वी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमात श्री वळसे पाटील बोलत होते. क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले पुण्यतिथी सोहळा समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाईंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी बालविवाहाला प्रतिबंध केला, परंतु आज अठरा वर्षाखालील मुलींचे विवाह लावले जात असल्याची खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीपातीला कधीही थारा दिला नाही. परंतु हल्ली या दैवतांना समाजाने वाटून घेतल्याचे चित्र दिसत आहे.

अलीकडील काळात इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात असून, नवीन इतिहास पुढे येऊ लागला आहे. आगामी काळात सामाजिक न्यायासाठी विचारांची लढाई करावी लागणार आहे. रज्यघटनेचे पालन व लोकशाहीची जोपासना करून समाजात ऐक्याची भावना निर्माण करून प्रगती साधता येईल असे श्री वळसे पाटील यांनी सांगितले.

"दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथे प्रथमच महात्मा फुले यांची एकत्रित पुण्यतिथी साजरी होत आहे. आगामी काळातही अशीच एकी समाजामध्ये ठेवावी, पुण्यतिथीचे उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले."

खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले - शाहू -आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत ओढले जात आहे. सत्यशोधक समाजाची तत्वे अंगीकारणे गरजेचे आहे. जातीपेक्षा गुण व कर्तव्य महत्वाचे आहे. जातीनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक समाजाला संपत्तीत व सत्तेत वाटा मिळेल. समाजसुधारकांचे पुरोगामी विचार आधुनिक पिढीला महत्त्वाचे आहेत. छत्रपतींचा आदर्श महापुरुषांनी पुढे नेला. समाजाच्या हक्कासाठी भांडण, मांडणी व जाणीव असली पाहिजे असे डॉ.कोल्हे यांनी सांगितले.

.. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ आदींची भाषणे झाली.

"यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत व रांजणगाव गणपतीचे माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले".

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, शिरूर -आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती अरविंद ढमढेरे व प्रकाश पवार, माजी उपसभापती अनिल भुजबळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्निल ढमढेरे, उद्योजक सदाशिव पवार, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटभाऊ भुजबळ, संचालक विश्वास ढमढेरे, सोपानराव गवारे, डॉ एकनाथ खेडकर, डॉ. वर्षा शिवले, मोनिका हरगुडे, विद्या भुजबळ, सोपानराव भाकरे, बाजार समितीचे सभापती वसंतराव कोरेकर, संचालक ऍड.सुदीप गुंदेचा, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, ओबीसी सेवा संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब लांडे, संचालक बाळासाहेब ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, बापू कुदळे, संदीप ढमढेरे, गणेश तोडकर, वसंत भुजबळ, महेश भुजबळ, किरण बनकर, शिवाजी ढमढेरे, निवृत्ती जकाते, समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रस्ताविक बाळासाहेब नरके यांनी केले. पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांनी स्वागत केले. प्रा. माणिकराव खेडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.