महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ, स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे बारामती, वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरीला उधाण आले आहे. पुणे शहर, जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील मतदारसंघामध्ये बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्व पक्षिय नेत्यांना त्यांचे राजकीय कौशल्यपणाला लावावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा (ता. २९) शेवटचा दिवस होता.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमध्ये आणि काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमध्ये आजच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून रस्सी खेच सुरु होती. या पक्षांनी जागा वाटप केल्याने महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे अजित पवार आणि महाविकास आघाडीतर्फे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे या ठिकाणी बंडखोरी झालेली नाही.