पुणे - जगताना समाजभान राखायचं... चळवळीत उतरायचं आणि प्रत्यक्ष मैदानात यायचं, हे मराठी माणसाचे (Marathi People) वैशिष्ट्यं. जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी, त्याचा मराठी बाणा कायम असतोच.... त्यातूनच टोकियेमधील विधानसभा निवडणूक (Tokiyo Assembly Election) लढविण्याठी मैदानात उतरले आहेत ते कधीकाळी पुणेकर (Pune) असलेले योगेंद्र पुराणिक. (Yogendra Puranik) ही निवडणूक लढणारे पुराणिक हे पहिले भारतीय (Indian) नव्हे तर, पहिले आशियायीही ठरले आहेत. जपानी (Japan) पद्धतीने त्यांचा प्रचार आता रंगात येऊ लागला आहे. (Pune Yogendra Puranik Tokiyo Assembly Election MLA Politics)
पुराणिकांचा जन्म मूळचा अंबरनाथचा. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस. पी. कॉलजमध्ये झालं. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम. ए. केलं. दरम्यानच्या काळात फर्ग्युसन रस्त्यावरील परकीय भाषा विभागातून जपानी भाषेचे धडे त्यांनी गिरविले. ‘आयटी़’चे काही अभ्यासक्रम पूर्ण केले. इथंच नोकरीही मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यावर पहिल्यांदा एक महिन्यांसाठी तर नंतर एक वर्षांसाठी ते जपानला पोचले. हा देश त्यांना भावला अन पुण्यातील बस्तान गुंडाळून ते जपानी झाले. गेल्या २० वर्षांपासून जपानमध्ये राहत असल्यामुळे ते आता तेथील अधिकृत नागरिक झाले आहेत. आयटीनंतर बॅंकेतील नोकरी, उद्योग- व्यवसाय करून ते आता हॉटेल व्यवसायात आहेत. अगदी पुरणपोळीपासून ते उपम्यापर्यंतचे पदार्थ देणारे ‘रेखा - इंडियन होम फूड’ हे हॉटेलही त्यांनी एदुगवामध्ये उघडले असून आता ‘योगी’ हे त्यांचे दुसरे हॉटेलही अल्पावधीत सुरू होणार आहे.
एदुगवा हे सात लाख लोकसंख्येचे शहर. त्या शहरातील आपल्या महापालिकासदृश्य सिटी ॲसेंम्ब्लीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. आता पुढची पायरी म्हणून टोकियो ॲसेंम्ब्लीची निवडणूक ते लढवित आहेत. मतदान ४ जुलै रोजी होणार असलं तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉन्स्टिट्यूशन पार्टीने चार वेळा सर्वेक्षण झाल्यावर त्यांची उमेदवारी २० एप्रिलला जाहीर केली. त्यामुळे आता योगेंद्र हे प्रचारासाठी अगदी सकाळी ६ वाजताही रेल्वे स्थानकावर पोचतात अन वृत्तपत्रांतून पत्रकेही पाठवितात. ४ लाख ५० हजार मतदार असलेल्या या शहरातून विजयी होण्यासाठी पुराणिक यांना किमान ४० हजार मते हवी आहेत. अन तेथे भारतीय मतदार आहेत फक्त ७.
जपानमध्ये परदेशी नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुवा सांधण्याचे काम पुराणिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळे तेथील मीडियामध्ये ते लोकप्रिय असून प्रशासनातही त्यांना आता ओळखले जाते. त्यातच दोन वर्षांपूर्वी नगरसेवकपदाची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून जिंकली असल्यामुळे जपानी रहिवाशांनाही ते परिचित आहेत. भारतीय नागरिकांसाठी त्यांनी ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स ही संघटनाही काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केली आहे. तिच्या माध्यमातूनही ते सक्रिय आहेत. जपानमध्ये २०११ मध्ये भूंकप झाला तेव्हा त्यातील जखमींना भारतीय नागरिकांच्या मदतीने जेवण व मदत त्यांनी पुरविली होती. ही खूणगाठही जपानी नागरिकांच्या मनात कायम आहे. त्यांची ६५ वर्षांची आई रेखा, या त्यांच्यासोबतच जपानमध्ये राहतात तर १८ वर्षांचा मुलगा चिन्मय हा इंग्लंडमध्ये शिक्षण घेतो. निवडणुकीसाठी आई आणि मुलाची त्यांना अप्रत्यक्षपणे मदत होतेच.
निवडणुकीसाठी त्यांना सुमारे १५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील पाच लाख रुपये त्यांचा पक्ष खर्च करणार आहे तर, उर्वरित रक्कम ते देणग्यांतून गोळा करणार आहेत. निवडणुकीसाठी परदेशातून मदत घेता येत नाही अन, जास्त खर्चही करता येत नाही. कारण त्यावर निवडणूक आयोगाचे काटेकोर लक्ष असते. तसेच फोन किती करायचे, पत्रके किती पाठवायचे, रस्त्यावर प्रचार कधी करायचा यावरही निर्बंध आहेत. त्यांचा खरा प्रचार सुरू होणार आहे ते २५ जून ३ जुलै दरम्यान. त्या वेळी त्यांच्या प्रचार व्हॅनसाठी, चालकासाठी आणि निवेदकासाठी पब्लिक फंडमधूनही निधी मिळतो, अशी माहिती पुराणिक यांनी दिली. जपानमध्ये जपानी भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. इंग्रजीमध्ये कोणी फारसे बोलत नाही. त्यामुळे जपानी भाषा यायलाच हवी, असेही त्यांनी सांगितले.
योगेंद्र पुराणिक म्हणतात, ‘‘निवडणूक लढविण्यासाठी जपानचे नियम फार कोटेकोर आहेत. त्यानुसारच प्रचार करावा लागतो. तसेच जपानी शिष्टाचार महत्त्वाचे ठरतात. आपल्यासारखे नगरसेवक, आमदार आणि खासदार हे टप्पेही जपानमध्ये आहेत. या निवडणुकीत विजयी झाल्यावर खासदार म्हणजेच नॅशनल ॲसेंब्लीमध्येही पोचण्याचा प्रयत्न असेल.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.