Pune ebus - ‘पीएमपी’त ई-बसच्या तुलनेत ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बस वाहतुकीचा प्रवास २० टक्क्यांनी स्वस्त आहे. ई-बसला एक किलोमीटरसाठी १०२ रुपये, तर ‘सीएनजी’ बसला ८५ रुपये खर्च येतो. त्यामुळे येत्या काळात सीएनजी बसची संख्या वाढणार हे निश्चित झाले आहे. तसे झाल्यास वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. संख्येचा समतोल साधण्यासाठी ई-बसला ब्रेक लागेल, अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या ई-बस धोरणानुसार प्रवासी सेवा देणाऱ्या संस्थेत २०३० पर्यंत ३० टक्के ई-बस असणे आवश्यक आहे. राजकीय दबावामुळे ‘पीएमपी’ने ही स्थिती २०२३ मध्येच गाठली आहे. सध्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात ३२ टक्के ई-बस आहेत. येत्या सात वर्षांत एकही नवी ई-बस घेतली नाही, तरीही चालू शकेल, अशी स्थिती आहे.
गेल्या काही दिवसांत हेतुपूर्वक ई-बसचा भरणा केल्याचा फटका ‘पीएमपी’ला सहन करावा लागत आहे. सध्या ४५८ ई-बस असून, त्या सर्व ठेकेदारांच्या आहेत. ई-बसच्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा वाहतुकीचा खर्च जास्त आहे. शिवाय, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, दुपारच्या वेळेत फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाणही अधिक आहे. याचा प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे.
ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त असल्याने त्यांची एकप्रकारे ‘पीएमपी’वर मक्तेदारी निर्माण झाली आहे. वाहतुकीचा खर्च व ठेकेदारांचे वर्चस्व कमी करण्यासाठी ‘पीएमपी’ आता सीएनजी बसची संख्या वाढविणार आहे. तसेच, ई-बसची संख्या कमी करीत बसच्या संख्येत समतोल साधणार आहेत.
अधिकाऱ्यांचे म्हणणे...
ई-बसची बॅटरी उपलब्ध होत नसल्याने गेल्या १६ महिन्यांपासून १९२ बसची प्रतीक्षा आहे, त्या कधी उपलब्ध होतील माहिती नाही .
चार्जिंगसाठी बराच वेळ लागतो. चार्जर एसी असल्यास पाच तास लागतात आणि चार्जर डीसी असल्यास दोन तास ३० मिनिटे लागतात
दुपारच्या वेळी प्रवासी संख्या जास्त असते, त्यावेळी २००हून अधिक बस चार्जिंगला असतात. त्यामुळे दिवसाला सुमारे २००हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागतात
ई-बसचे सुटे भाग मिळण्यात अनेक अडचणी येतात. शिवाय त्यांच्या दुरुस्तीसाठी हैदराबाद येथून कर्मचारी येतात, त्यात खूप वेळ वाया जातो .(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.